उत्तर प्रदेशात आग्रा या ऐतिहासिक शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा एक नवा आविष्कार साकारत आहे. हा प्रयोग आहे रबराचे धरण बांधण्याचा. याला राष्ट्रीय पर्यावरण इंजिनिअरिंग संशोधन संस्थेने मान्यता दिल्यानंतर आता याचे काम सुरु झाले आहे. या धरणाचा पाया नेहमीप्रमाणे काँक्रीटचाच असेल. मात्र, याच्या भिंती आणि द्वारे मात्र रबराची असतील. पोलादी दरवाजांच्या ऐवजी रबरी फुगे बसविले जातील. हे तंत्रज्ञान दक्षिण कोरियात विकसीत केले गेले आहे.
ताज बैराज येथे हे धरण साकारत आहे. या धरणाचा सांगाडा काँक्रीटचाच असेल. मात्र दरवाजांऐवजी रबराचे फुगे असतील. या फुग्यांमध्ये वायू भरल्यानंतर दरवाजे बंद होऊ शकतात. तसेच फुग्यांमधील वायू जितक्या प्रमाणात कमी केला जाईल तितके दरवाजे उघडले जातील. हे फुगे पोलादी दरवाजांपेक्षा जास्त प्रभावी पद्धतीने पाणी रोखण्याचे किंवा सोडण्याचे काम करतील. हे फुगे विशेष प्रकारच्या रबरापासून तयार होतात. या धरणात साधारणतः 50 ते 55 मीटर लांबीरुंदीचे असे पाच फुगे बसविण्यात येणार आहेत. हे फुग्यांचे दरवाजे पोलादी दरवाजांपेक्षा जास्त बळकट आणि शक्तीशाली असतात. तसेच त्यांच्या उघडण्या मिटविण्यासाठी वेळ आणि खर्चही कमी येतो. ते टिकाऊही जास्त असतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे धरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची योजना आहे.









