यावषी 17081.96 टक्के उद्दिष्ट पूर्ण : कर जमा करण्यात आरटीओ कार्यालय अव्वल
बेळगाव : कोरोनानंतर आता आरटीओ विभागाने कर जमा करण्यात मोठे यश संपादन केले आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर जमा करून अव्वल स्थान मिळविल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून 100 कोटीचे उद्दिष्ट देण्यात येत होते. मात्र यावर्षी दीडशे कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आता ते पूर्ण करून त्याहून अधिक कर मिळविल्याने सरकारच्या तिजोरीत भर पडली असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनामुळे अनेक उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. यामध्ये सरकारी कार्यालयेही अपवाद नाहीत. त्यामुळे कधी एकदा कोरोनाचे उच्चाटन होते, असेच साऱ्यांना वाटू लागले आहे. असे असले तरी आरटीओ कार्यालयाने महसूल गोळा करणे थांबविले नव्हते. कामकाज सुरळीत सुरू असल्याने आरटीओ विभागाने कर जमा करण्यात मोठे यश संपादन केले आहे. त्यामुळे आता यावर्षीही मोठ्या प्रमाणात कर जमा झाला आहे. 2020-21 सालात 94.34 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले होते तर 2021-22 सालात 100.40 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात केले. आता 2022-23 मध्येही 100 टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, 2022-23 सालात 15136.56 लाख उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यामध्ये 17081.96 लाखांचा कर गोळा करण्यात आल्याने दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. वाहन आणि सारथी अशा दोन्ही ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून कर गोळा करण्यात आला आहे.
आरटीओ कार्यालयाच्या स्थलांतरानंतर महिनाभर समस्या निर्माण झाल्या होत्या. आरटीओ कार्यालयाचे स्थलांतर बीएसएनएल कार्यालयात करण्यात आल्याने अनेकांना कार्यालय स्थलांतर झाल्याची माहिती नव्हती. त्यामुळे काही दिवस याचा परिणाम जाणवला. मात्र आता पुन्हा कार्यालयातील कामकाज सुरळीत सुरू झाल्याने करदाते कर भरण्यासाठी कार्यालयात जावू लागले आहेत. त्यामुळेच उद्दिष्ट पूर्ण करणे सोपे झाल्याचे सांगण्यात येत आहे. बेळगाव व खानापूर तालुक्मयात वाहनांच्या खरेदीत वाढ झाली असून आरटीओ कार्यालयात नोंदही होत आहे. अनेक वाहनांचे थकीत करही भरण्यात येत असल्यामुळे महसुलात भर पडत आहे. दरवषी बेळगाव आरटीओ कार्यालयात कोटींहून अधिक कर मिळत असतो. आता बेळगाव शहरातील व खानापूर तालुक्मयात वाहने घेण्याकडे कल वाढल्याने महसुलात वाढ होत आहे. याचबरोबर वाहन परवाना व इतर कामांना चालना दिल्याने कर गोळा करण्यात आला आहे.
उद्दिष्टापेक्षा अधिक कर गोळा करू : आरटीओ नागेश व्ही. मुंडास
कोरोनामुळे आरटीओ विभागाला कोट्यावधीचा फटका बसला होता. मात्र आता बऱ्यापैकी सर्व कामे सुरळीत झाली आहेत. मात्र कार्यालय स्थलांतरित करण्यात आल्याने काहीकाळ समस्या जाणवल्या. आता त्याही कमी होत असून अनेकांना कार्यालय स्थलांतरित झाल्याचे समजते. त्यामुळे नियमित कामकाज सुरू झाले आहे. आपल्या सहकारी व इतरांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मात्र अधिक कर सरकारला कसा जमा होईल, यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत.
2022-23 मध्ये जमा केलेला कर
- एप्रिल 1261.38 1593.94
- मे 1261.38 1261.65
- जून 1261.38 1190.52
- जुलै 1261.38 1145.63
- ऑगस्ट 1261.38 1240.02
- सप्टेंबर 1261.38 1515.99
- ऑक्टोबर 1261.38 1955.67
- नोव्हेंबर 1261.38 1411.79
- डिसेंबर 1261.38 1315.85
- जानेवारी 1261.38 1366.43
- फेब्रुवारी 1261.38 1235.5
- मार्च 1261.38 1848.98
- एकूण 15136.56 17081.96









