दुसऱ्या मजल्याच्या कामाला सुरुवात : सुसज्ज इमारत होणार
बेळगाव : सोन्यामारुती चौक येथे असणारे जुने आरटीओ कार्यालय जीर्ण झाल्याने सहा महिन्यांपासून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. पहिल्या मजल्याचे काम पूर्ण होत आले असून दुसऱ्या मजल्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावला हायटेक आरटीओ इमारत येत्या काही दिवसात उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय अनेक वर्षांपासून सोन्यामारुती चौक येथे होते. परंतु, काळानुसार इमारत जीर्ण झाली. तसेच अंतर्गत भाग कार्यालयासाठी अपुरा ठरत असल्याने नवीन इमारतीची गरज निर्माण झाली. नवीन इमारत बांधकामासाठी अनेक वेळा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आले. परंतु, निधीमुळे हा प्रस्ताव प्रलंबित होता. परंतु, सात-आठ महिन्यांपूर्वी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीचा शुभारंभ करण्यात आला. जुनी इमारत जमीनदोस्त करून त्या ठिकाणी आता नवीन सुसज्ज इमारत उभी केली जात आहे. आरटीओ कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात कॅम्प येथील बीएसएनएल कार्यालय परिसरात सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी जागा अत्यंत अपुरी असून अनेक रेकॉर्ड ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाची इमारत लवकर पूर्ण करण्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नव्या इमारतीसोबतच आरटीओ कार्यालयाचा कारभारही सुधारण्याची अपेक्षा सामान्यांतून व्यक्त होत आहे.
सर्व सोयींनीयुक्त आरटीओ इमारत लवकरच
बेळगाव आरटीओ कार्यालयासाठी मागील सहा महिन्यांपासून नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. अत्याधुनिक सुविधा असणारी सुसज्ज इमारत उभारण्यात येत असून पहिल्या मजल्याचे काम पूर्णत्वाला आले आहे. दुसऱ्या मजल्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावला सर्व सोयींनीयुक्त आरटीओ इमारत लवकरच उपलब्ध होईल.
-नागेश मुंडास, आरटीओ









