देवरुख :
देवरुख साखरपा मार्गावरील मार्लेश्वर फाटा येथे एका खासगी कंपनीकडून कोणतीही परवानगी न घेता रस्ता खोदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू होते. रस्त्याच्या बाजूने चर खोदाई केल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे काम थेट बंद पाडले. वर्कऑर्डर मिळाल्यानंतर तसेच पावसाळा संपताच हे काम सुरू करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
देवरुख साखरपा हा मुख्य मार्ग आहे. वाहनांची सदैव ये-जा सुरू असते. खासगी कंपनीकडून केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जेसीबीच्या सहाय्याने चक्क रस्त्याजवळून तसेच रस्त्याची खोदाई करून केबल टाकली जात होती. मुसळधार पावसात हे काम सुरू होते. खोदाई केलेली माती रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आली होती. खोदाईमुळे वाहने रस्त्याच्या खाली उतरल्यास रुतण्याची भीती आहे. याची दखल माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेत घटनास्थळी भेट देवून वस्तुस्थितीची पाहणी केली.
वर्कऑर्डर नसतानाही हे काम सुरू होते. याची माहिती पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरुख व देवरुख पोलीस ठाणे यांना दिली. तत्काळ पोलीस निरीक्षक उदय झावरे हे घटनास्थळी दाखल झाले. पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता असल्याने हे काम करू नये, कंपनीवर कारवाई करण्यात यावी, पूर्वीप्रमाणे रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव, तालुकाध्यक्ष शेखर जोगळे, प्रशांत विंचू माथाडी कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस शेखर नलावडे यांनी पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्याकडे केली.
- अपघात घडल्यास जबाबदार कोण?
संबंधित कंपनीचे अधिकारीही कामाच्या ठिकाणी उपस्थित नव्हते. खोदाईमुळे अपघात घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यानंतर हे काम बंद करण्यात आले. अनेक ठिकाणी मनमानी कारभार होत असून अशाप्रकारे खोदकाम होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे गुरव यांनी नमूद केले आहे.








