कोल्हापूर :
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी ‘शिक्षणाचा हक्क कायदा’ (आरटीई) अंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव ठेवलेल्या 25 टक्के जागांपैकी मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यभरातील 8836 खासगी शाळांमध्ये 1,09,102 जागांसाठी 3,05,151 अर्ज प्राप्त झाले. मात्र, चौथ्या फेरीअखेरही 21,093 जागा भरल्या गेल्या नाहीत. कोल्हापूर जिह्यातसुद्धा 1095 जागा रिक्त असून, ही स्थिती चिंताजनक ठरत आहे.
- तिप्पट अर्ज, तरीही रिक्त जागा
आरटीईअंतर्गत यावर्षी 14 जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. सोडतीद्वारे एकूण 1,01,967 विद्यार्थ्यांची निवड झाली होती, पण त्यापैकी केवळ 69,526 विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला. पसंतीच्या शाळेत प्रवेश न मिळणे, दूरवरची शाळा मिळणे, किंवा शाळेबाबत असमाधान यामुळे पालकांनी निवड असूनही प्रवेश न घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
- कोल्हापुरातही तीच अवस्था
जिह्यात 328 खाजगी शाळांमध्ये एकूण 3257 जागा उपलब्ध होत्या. यासाठी 4780 अर्ज आले. त्यातून 3486 विद्यार्थ्यांची निवड झाली, मात्र फक्त 2165 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. परिणामी, 1095 जागा रिक्त राहिल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज असूनही जागा रिक्त राहणे म्हणजे प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी आणि पालकांच्या अपेक्षा समजून न घेणे. यावर उपाय म्हणून प्रक्रियेची सुधारणा आणि शाळांची माहिती अधिक पारदर्शक पद्धतीने द्यावी, असे मत शिक्षणतज्ञांनी व्यक्त केले आहे.
- पालकांना माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव
अनेक पालकांना आरटीई प्रक्रियेची सविस्तर माहिती नसते
अर्जात पसंतीक्रम चुकीचे भरला जातो
निवड झाल्यानंतर पुढील टप्प्यांची माहिती नसते
शाळेचे स्थान, माध्यम किंवा दर्जाबाबत शंका असते
शासनाने स्थानिक पातळीवर हेल्पलाईन, माहिती सत्र आणि मदत केंद्र सुरू करणे गरजेचे
- शिक्षण विभागाने गांभीर्याने पाहणे गरजचे
आरटीई अंतर्गत शिक्षण घेण्याची संधी वंचित वर्गाला मिळावी म्हणून सरकारने ही योजना सुरू केली. पण जागा रिक्त राहणे हे व्यवस्थेतील कमतरतेचे लक्षण आहे. योग्य नियोजन, जागरुकता आणि पालकांपर्यंत पोहोचणारे मार्गदर्शन हेच यावर उपाय आहेत. शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
– महेश चव्हाण, माजी अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना समिती, हातकलंगले
- संधी मिळूनही ती वाया का जाते
शासन आणि शाळा प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून, पुढील वर्षासाठी अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक योजना आखणे गरजेचे आहे.
राजस्तरीय तपशील
शाळा 8836
एकूण जागा 109102
अर्ज 305151
प्रवेश 88009
रिक्त जागा 21093
फेरीनिहाय तपशील
फेरी प्रवेश
पहिली नियमित 69526
पहिली प्रतीक्षा यादी 12036
दुसरी प्रतीक्षा यादी 4804
तिसरी प्रतीक्षा यादी 1504
चौथी प्रतीक्षा यादी 139








