पुणे / प्रतिनिधी :
शिक्षण विभागाकडून बुधवारी आरटीई प्रवेशाची लॉटरी काढण्यात आली. ऑनलाइन लॉटरीची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी एनआयसीकडे लॉटरीद्वारे काढण्यात आलेले क्रमांक पुढील प्रक्रियेसाठी दिले जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना 12 एप्रिल रोजी प्रवेशाचे संदेश नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणार आहेत, असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी बुधवारी दिली.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे 2023-24 या शैक्षणिक वर्षातील 25 टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. या वेळी गोसावी यांच्यासह विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, एनआयसीचे उपमहासंचालक अशोक कौल, एससीईआरटीचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, योजना विभागाचे संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.
राज्यातील 8 हजार 828 शाळांमधील 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 66 हजार 562 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील तब्बल 2 हजार 172 अर्ज दुबार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी 3 लाख 64 हजार 390 विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशासाठी राहिले. या विद्यार्थ्यांची बुधवारी लॉटरी काढण्यात आली. त्यासाठी महापालिकेच्या गोगटे शाळेतील विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात चिठ्ठय़ा उचलल्यानंतर प्रत्यक्ष ऑनलाईन प्रक्रियेला सुरूवात झाली.
अधिक वाचा : सलग पाच दिवस पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार








