प्रतिनिधी / सातारा :
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस सुरूवात झाली होती. यामध्ये 25 टक्के राखीव जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात आले. सदरच्या अर्ज प्रणालीची मुदत नुकतीच संपली असून एकूण 227 शाळांकरीता एकूण 3269 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
या आरटीई प्रणलीअंतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि वंचित घटकातील मुला-मुलींसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. प्रतिवर्षी या अर्ज प्रणालीस लवकर प्रारंभ होतो. पण यंदा मात्र 2022-23 या शैक्षणिक वर्षात खासगी शाळांनी नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ केल्याने प्रवेश प्रक्रियेला उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे यंदा या प्रक्रियेस चांगलाच विलंब होणार आहे. त्यातच आता अर्जांची पडताळणी करून आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मागील काही वर्षापासुन आर्थिक दृष्टय़ा मागास असलेल्या विद्यार्थ्यांकरीता ही विशेष मोहिम राबविण्यात येत असून आजवर अनेकांना याअंतर्गत प्रवेश देण्यात आला आहे. पण संबंधित खासगी संस्थाचालकांना याकरीता येणारे अनुदान अद्याप ही न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पण लवकरच अनुदान देण्यात येणार असल्याचे आश्वासन शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहे.









