आयपीएल 16 : रॉयल्सचा किल्ला भेदण्यात सीएसके अपयशी : यशस्वी जैस्वाल सामनावीर, शिवम दुबेचे अर्धशतक वाया

वृत्तसंस्था /जयपूर
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान राजस्थानने उत्कृष्ट सांघिक खेळ दाखवत 32 धावांनी चेन्नई सुपरकिंग्सवर विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने पुन्हा एकदा गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. 43 चेंडूत 77 धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता दाखवून देत नोंदवलेले चमकदार अर्धशतक आणि ध्रुव जुरेल व देवदत्त पडिक्कल यांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने चेन्नईविरुद्ध आयपीएलमधील साखळी सामन्यात निर्धारित 20 षटकांत 5 बाद 202 धावा फटकावल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला 6 बाद 170 धावापर्यंत मजल मारता आली. चेन्नईचे ओपनर ऋतुराज गायकवाड आणि देव्हॉन कॉनवेने संघाला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 42 धावांची भागीदारी केली. पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर अॅडम झाम्पाने कॉनवेला बाद केले. त्याने 8 धावा केल्या. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणेने डाव पुढे नेला. मात्र ऋतुराज दहाव्या षटकात 47 धावांवर बाद झाला. त्याचीही विकेट झाम्पानेच घेतली. त्यानंतर पुढच्याच षटकात अश्विनने अजिंक्य रहाणेला 15 तर अंबाती रायुडूला शून्यावर आऊट केले. यानंतर झाम्पाने पंधराव्या षटकात मोईन अलीचीही विकेट घेतली. मोईन अलीने 23 धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबे आणि रविंद्र जडेजाने शेवटपर्यंत फलंदाजी करत संघाची धावसंख्या 170 वर नेली. दुबेने झुंजार अर्धशतक नोंदवताना 52 धावा केल्या. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. तो शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. राजस्थानकडून अॅडम झाम्पाने 3, अश्विनने 2 तर कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.

जैस्वालची फटकेबाजी
प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर सलामीस आलेल्या जैस्वालने प्रारंभापासूनच आक्रमण करीत चौफेर फटकेबाजी केली. त्याने 43 चेंडूत 8 चौकार, 4 षटकारांची आतषबाजी करीत 77 धावा फटकावल्या. नंतर पडिक्कल (13 चेंडूत नाबाद 27) व ध्रुव जुरेल (15 चेंडूत 34) यांनी अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी करीत 48 धावांची भर घातली. येथील सवाई मानसिंग स्टेडियमवरील त्यांनी नोंदवलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. जैस्वालने आकाश सिंगला विशेष टार्गेट केले होते. त्याच्या दोन षटकांतच तब्बल 32 धावा वसूल केल्या गेल्या. त्याच्या पहिल्याच षटकात जैस्वालने 3 चौकार ठोकले. सामन्यातील पहिला चेंडू त्याने कव्हरच्या दिशेने फटकावला, त्यानंतरचे दोन चेंडू त्याने डीप एक्स्ट्रा कव्हर व डीप मिडविकेटच्या दिशेने पिटाळले. नंतर आकाशच्या दुसऱ्या षटकांत त्याने 18 धावा फटकावल्या. या षटकात त्याने 3 चौकार व एक षटकार लगावला. तुषार देशपांडे (42 धावांत 2 बळी) व आकाश सिंग महागडे ठरल्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने महीश थीक्षणाचा फिरकी मारा सुरू केला. त्याने पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली. दरम्यान जैस्वालने 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. नंतर जोश बटलरने फटकेबाजी करताना काही चौकार मारले. जैस्वाल व जोश या जोडीने राजस्थानला 86 धावांची भक्कम सलामी दिली. जडेजाने बटलरला बाद करून ही जोडी फोडली. बटलरने 21 चेंडूत 4 चौकारांसह 27 धावा काढल्या. या बळीनंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांवर बऱ्यापैकी अंकुश ठेवताना काही झटपट बळीही मिळविले. तुषार देशपांडेने दुसऱ्या स्पेलमध्ये कर्णधार संजू सॅमसन (17) व जैस्वालला यांचे बळी मिळविले. एकाच षटकात त्याने हे दोन्ही बळी मिळविले. यावेळी 14 व्या षटकात 3 बाद 132 अशी राजस्थानची स्थिती होती. थीक्षणाने नंतर बिग हिटर शिमरॉन हेटमायरला 8 धावांवर त्रिफळाचीत केले. जुरेल व पडिक्कल यांनी 20 चेंडूतच 48 धावा फटकावत संघाला दोनशेच्या टप्प्यावर आणून ठेवले. जुरेल शेवटच्या षटकात बाद झाला. उर्वरित चार चेंडूत 8 धावा फटकावत पडिक्कलने संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला. पडिक्लकने आपल्या खेळीत 5 चौकार तर जुरेलने 3 चौकार, 2 षटकार मारले. तुषार देशपांडेने 2, थीक्षणा व जडेजा यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 5 बाद 202 : जैस्वाल 43 चेंडूत 8 चौकार, 4 षटकारांसह 77, बटलर 21 चेंडूत 27, सॅमसन 17 चेंडूत 17, हेटमायर 8, ध्रुव जुरेल 15 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 34, पडिक्कल 13 चेंडूत नाबाद 27, अश्विन नाबाद 1, अवांतर 11. गोलंदाजी : तुषार देशपांडे 2-42, थीक्षणा 1-24, जडेजा 1-32.
चेन्नई सुपर किंग्स 20 षटकांत 6 बाद 170 (ऋतुराज गायकवाड 47, शिवम दुबे 52, मोईन अली 23, जडेजा नाबाद 23, अश्विन 35 धावांत 2 बळी, झाम्पा 22 धावांत 3 बळी, कुलदीप यादव 1-18).









