जत, प्रतिनिधी
जर मिळाले नाही अर्थ तर तुमच्याकडे येऊन सारे व्यर्थ अशी कवितेतून मिश्किल टिप्पणी करत केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी अजितदादा पवार यांना तिढ्यात अडकलेले अर्थ खाते कसे मिळाले असे सांगत आता महायुतीला आणखी आमदार नकोत, असा अंदाज व्यक्त करून पुढच्या पक्ष फुटीला ब्रेक असल्याचे संकेत दिले. तसेच जत मधील दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री यांना बोलून उपाय योजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने जत शहरातील रस्ता डांबरीकरण व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्यावेळी मंत्री आठवले बोलत होते .
यावेळी खासदार संजयकाका पाटील, केंद्रीय सिमेंट बोर्डाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विवेक कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, प्रदेशद्याक्ष राजाभाऊ सरवदे, राजेंद्र खरात, सुरेश बारसिंगे, तालुकाध्यक्ष संजय पाटील-कांबळे, हेमंत चौगुले, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, मंगेश सावंत आदी उपस्थित होते.
मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीतून राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. शिवसेनेचे ४० आमदार तर अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्या आहेत. त्यातील ३६ आमदार सद्या आहेत. चार आमदार काही वेळा साहेबांकडे तर काहीवेळा अजितदादाकडे झुकतात. त्यामुळे त्यांची तळ्यात मळ्यात अशी अवस्था असल्याचे सांगून आत्ता बस्स झाले आणखी आमदार आम्हाला नको आहेत म्हणून एकप्रकारे सत्तेतील इनकंमिंगला ब्रेक लावला.
अजितदादांचा व त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर खाते वाटप विषयी बऱ्याच वावड्या उठल्या. खातेवाटप होणार नाही अशी गर्जनाही करण्यात आली. शिंदे गटाचा अजितदादांना अर्थ खाते देण्यास विरोध होता. त्यामुळे रखडलेला खाते अखेर आज झालाच. मिळाले नाही अर्थ, तुमच्याकडे येऊन सारे व्यर्थ! असे अजितदादा म्हणल्यानेच त्यांना हे खात द्यावे लागल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार पटल्यानेच ही मंडळी भाजपकडे येत आकर्षित होत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली .
दरम्यान, खासदार संजयकाका पाटील यांचे कौतुकही कवितेतून करताना दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांना दिलासाही मंत्री आठवले यांनी दिला. ‘सगळयावर प्रसंग आला बाका, धावून आले काका! शांत आहे वाणी, म्हणून मिळाले पाणी! गेली अनेक वर्षे गातो आम्ही भिमाची गाणी, मी आणि काका मिळून देऊ तुम्हाला पाणी! असे म्हणून शेतीला पाणी देण्यासाठी संजयकाकानी प्रयन्त केले असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार नाहीत असा विश्वास व्यक्त करून मी सत्तेत आहे संविधान बदलू देणार नाही. माणसाने स्वतः बदलले पाहिजे सर्व जाती धर्माना बरोबर रिपाई पक्ष बळकट करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशात रिपाई वाढते आहे, त्यामुळं तुम्ही तळागाळातील लोकांना सोबत घेऊन काम करा. संजय कांबळे चांगला कार्यकर्ता आहे, त्यांना पाठबळ द्या असे आवाहन ना. आठवले यांनी केले.
जतच्या दुष्कळावर आज आढावा बैठक : खा. संजयकाका पाटील
पाऊस लांबल्याने जत तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे पण काळजी करू नका मी शनिवारी आढावा बैठक घेणार असून प्रशासनाला सर्व उपाययोजना करायला लावू असा विश्वास खासदार संजयकाका पाटील यांनी दिला.
खा. पाटील म्हणाले, पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे प्यायला पाणी नाही , जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्याने पश्चिम भागाला दिलासा मिळाला आहे. पूर्व भागातील ६७ गावची विस्तारीत योजना मंजूर झाली आहे. पहिल्या टप्याला पाचशे कोटींचा निधी मिळाला आहे. उरलेला निधी मिळणे गरजेचे आहे. तशी येथील लोकांची मागणी आहे.
येत्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार आहे.
सद्याची परिस्थिती भीषण असली तरी लोकांनी चिंता करू नये. उद्याच प्रशासनाची आढावा बैठक आयोजित केली आहे. सर्व उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सूचना देणार आहे. शिवाय विस्थारित योजनेचे काम आठ दिवसात सुरु करण्याचे नियोजन सुरु आहे, असेही त्यांनी स्पस्ट केले.