वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू व उत्तर प्रदेशचे क्रीडा संचालक आरपी सिंग यांची हॉकी इंडियाने राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. हरबिंदर सिंग यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून 15 एप्रिलपासून नव्या निवड समितीचे कामकाज सुरू होईल.
आरपी सिंग यांच्याव्यतिरिक्त बलविंदर सिंग, मोहम्मद रियाझ, एमएम सोमय्या, सुभद्रा प्रधान, सरदार सिंग, बीपी गोविंदा, चिंगलेनसाना सिंग कांजुगम, रजनीश मिश्रा, व्हीआर रघुनाथ, समीर दाड, युवराज वाल्मिकी जॉयदीप कौर, असुंता लाक्रा हे या नव्या पॅनेलमधील अन्य सदस्य आहेत. या समितीत प्रमुख प्रशिक्षक, शास्त्रीय सल्लागार, राष्ट्रीय पुरुष व महिला संघांचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर यांचा समावेश असेल.
27 मार्च रोजी झालेल्या हॉकी इंडिया कार्यकारी समितीच्या 98 व्या बैठकीत या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. आरपी सिंग यांची या समितीच्या चेअरमनपदी नियुक्त केल्याचे पत्र हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग यांनी त्यांना पाठविले आहे. त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल हॉकी इंडियातर्फे त्यांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे.
आरपी सिंग 1998 मध्ये ज्युनियर निवड समितीचे सदस्य होते. त्यानंतर 2021 मध्ये हॉकी इंडियाच्या हाय परफॉर्मन्स व डेव्हलपमेंट समितीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्याच वर्षी ते नंतर वरिष्ठ निवड समितीचे सदस्यही बनले होते. शनिवारी बेंगळूरमध्ये भारतीय संघाची दोन दिवस निवड चाचणी घेतली जाणार असून सिंग आपल्या कामकाजाला येथून सुरुवात करतील.









