वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यावर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा रोईंग संघ जाहीर करण्यात आला असून त्यात ऑलिम्पियन अर्जुन लाल जाट व अरविंद सिंग यांची निवड करण्यात आली आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा चीनमध्ये होणार आहे.
पुणे व हैदराबादमधील आर्मी रोईंग नोड येथे 21 जून ते 2 जुलै या कालावधीत घेण्यात आलेल्या चाचणीनंतर रोईंग संघाची निवड जाहीर करण्यात आली. या संघात एकूण 33 नावांचा समावेश आहे. त्यात 20 पुरुष व 13 महिलांचा समावेश आहे. पुरुष व महिलांसाठी दोन बदली खेळाडूंही निवडण्यात आले आहेत. अर्जुन व अरविंद सिंग हे पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्समध्ये तर जसविंदर सिंग पुरुषांच्या कॉक्सलेस फोर व कॉक्स्ड एट प्रकारात भाग घेणार आहे. गेल्या मेमध्ये झालेल्या वर्ल्ड रोईंग चषक स्पर्धेत भारतीय संघातून सहभागी झालेल्या भीम सिंगलाही या संघात स्थान मिळाले आहे.
2010 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने या प्रकारात सर्वोत्तम प्रदर्शन केले होते. चीनमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 3 रौप्य व एका कांस्यपदकाची कमाई केली होती. 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय रोवर्सनी एक सुवर्ण व दोन कांस्यपदके मिळविली होती.
भारतीय रोईंग संघ : पुरुष-बलराज पन्वर, सतनाम सिंग, परमिंदर सिंग, जाकर खान, सुखमीत सिंग, अरविंद सिंग, अर्जुन लाल जाट, बाबु लाल यादव, लेख राम, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष, नीरज, नरेश कलवानिया, नीतेश कुमार, डीयू पांडे. बदली खेळाडू : आशिष गोलियान, कुलविंदर सिंग.
महिला : किरण, अंशिका भारती, अश्वती पीबी, मृण्मयी निलेश एस., थांगजम प्रिया देवी, रुक्मणी, सोनाली स्वेन, रितू कौडी, वर्षा केबी, एच. तेंदेनथोइ देवी, जी. गीतांजली. बदली : रोज मेस्टिका मेरिल ए, अर्चा एजी.









