उंब्रज :
कराड तालुक्यातील अनेक गावांतील रेशनिंग दुकानांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित करण्यात आले आहे. सडलेला गहू आणि आळ्या लागलेले तांदूळ नागरिकांना वाटप करण्यात आले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे रेशन ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते संदीप घाडगे यांनी कराड येथील पुरवठा अधिकाऱ्यांना थेट खराब धान्य दाखवून वस्तुस्थिती समजावून सांगितली. मात्र, अधिकाऱ्यांनी “आम्ही काय करू?” अशी प्रतिक्रिया देत जबाबदारी झटकली. यामुळे रेशन ग्राहकांना न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल उपस्थित झाला आहे.
- खराब धान्यामुळे आरोग्य धोक्यात
सध्या नागरिकांना तीन महिन्यांतून एकदा रेशनिंगद्वारे धान्य मिळते. गेल्या चार दिवसांत कराड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गहू आणि तांदूळाचे वाटप करण्यात आले. मात्र शिवडे, वहगाव आणि इतर गावांमध्ये सडलेला गहू व आळ्या लागलेला तांदूळ देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हे धान्य खाल्ल्याने पोटदुखी, विषबाधा, इतर आजार होण्याची शक्यता आहे.
तथापि, पुरवठा विभाग व संबंधित यंत्रणांकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
- प्रशासनाच्या भूमिकेवर टीका
शिवडे येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप घाडगे यांनी सोमवारी कराड येथील पुरवठा शाखेत खराब धान्य घेऊन जाऊन अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला. मात्र, “आम्ही काय करू शकतो?” असे म्हणत अधिकाऱ्यांनी हात झटकले.
वहगावचे सरपंच संग्राम पवार यांनीही खराब धान्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत, “वाटपासाठी आलेले रेशनिंग धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, नागरिकांच्या मनात संतापाची भावना आहे. जर प्रशासनाने योग्य दर्जाचे धान्य पुरवले नाही, तर आमदार आणि खासदारांनीच हे धान्य खाऊन दाखवावे,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
- धान्य वाटप थांबवावे – तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांना मागणी
शिवडे गावातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये आलेला गहू पूर्णतः सडलेला असून त्यात सोंड व किडे आहेत. त्यामुळे अशा धान्याचे वाटप नागरिकांना करू नये, अशी मागणी ग्रामस्थ व दक्षता समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर धान्य दुकानदारांना वितरित होण्याआधीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करून ते थांबवावे, अशी स्पष्ट मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप घाडगे यांनी केली आहे.








