400 विद्यार्थ्यांसाठी 5 लाखाची तरतूद : 27 रोजी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात कार्यक्रम
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे ‘शिक्षण का सहारा’ हा उपक्रम राबविला जात आहे. कोरोना, कर्करोग याचबरोबर दुर्धर आजारांनी पालक गमाविलेल्या 400 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आणि 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. कार्यक्रम मंगळवार दि. 27 रोजी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे दुपारी 2.30 वाजता होणार असल्याचे क्लबचे अध्यक्ष रमेश रामगुरवाडी यांनी सांगितले.NB रोटरी या सेवाभावी संस्थेच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथने मागील 32 वर्षांमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांनी पालक गमावले आहेत. तसेच कर्करोग व इतर दुर्धर आजारानेही अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने त्यांना रोटरीने मदतीचा हात पुढे केला आहे.
विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत देणार
शिक्षण विभागाकडून पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली. त्याद्वारे 400 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 100 विद्यार्थ्यांनी आई व वडील गमावले आहेत. त्यांचा शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर 300 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. पंधरा विद्यार्थिनींना सायकलचे वाटप केले जाणार आहे. या प्रकल्पाला एकूण पाच लाख रुपये निधी खर्ची केला आहे. रोटरीच्या देणगीदारांकडून निधी जमा केल्याचे क्लबचे सदस्य अशोक नाईक यांनी सांगितले.
27 रोजी शैक्षणिक मदत वितरण
मंगळवार दि. 27 रोजी शैक्षणिक मदत वितरण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला धारवाड येथील कर्नाटक राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शिवप्रसाद, माजी प्रादेशिक आयुक्त डॉ. एम. जी. हिरेमठ, शहर शिक्षणाधिकारी वाय. जे. बजंत्री, रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडेसह इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला सेक्रेटरी गोविंद मिसाळे, विजय दरगशेट्टी, जयसिंहासह इतर उपस्थित होते.









