अधिकारग्रहण समारंभात रवी धोत्रे यांचे प्रतिपादन : व्हीटीयू सभागृहात कार्यक्रम उत्साहात
प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी ही सेवाभावी संस्था असून अनेक जणांच्या देणग्यांमधून तसेच वैयक्तिक कार्यामुळे रोटरीने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. रोटरीच्या कार्यामुळे सरकारनेसुद्धा रोटरीची मदत घेतली. प्रांतपालांसह रोटरीच्या सर्व सदस्यांनी असेच समाजाभिमुख काम करून आपला ठसा उमटवावा, अशी अपेक्षा पुण्याचे रवी धोत्रे यांनी व्यक्त केली.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रांतपाल म्हणून व्यंकटेश (बबन) देशपांडे यांची निवड झाली आहे. त्यांचा अधिकारग्रहण समारंभ रविवारी दुपारी 3 वाजता व्हीटीयूच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवी धोत्रे बोलत होते. व्यासपीठावर डॉ. संध्या देशपांडे व रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रवी धोत्रे यांच्या हस्ते व्यंकटेश देशपांडे यांना प्रांतपाल पदाची सूत्रे देण्यात आली. यावेळी धोत्रे यांनी रोटरी क्लब बेळगावने सर्वाधिक म्हणजे 15 कोटी रुपयांचा निधी रोटरी फौंडेशनला दिला आहे. तो असाच वाढत राहावा, असे आवाहन केले.
प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आपण प्रांतपाल झालो असून सर्वांना घेऊन काम करू, अशी ग्वाही दिली. प्रारंभी आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतीश धामणकर व माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
याप्रसंगी माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, गुरुदत्त भक्ता, विनय पै, रायकर, शरद पै, नासीर बोरसतवाला, गिरीश मासुरकर, सनथकुमार अरवाडे, प्राणेश जहागीरदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. कमलाकर आचरेकर व धनश्री कुलकर्णी यांनी केले. विनय बेहरे यांनी आभार मानले.









