खाद्यप्रेमींसाठी पर्वणी : अंगडी कॉलेज मैदानावर 200 हून अधिक स्टॉल
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावसह आसपासच्या खाद्यप्रेमींसाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावने अन्नोत्सव आयोजित केला आहे. दरवर्षी अन्नोत्सव केव्हा होणार, याबाबत खवय्यांमध्ये उत्सुकता असते. ही उत्सुकता आता लवकरच पूर्ण होणार असून, येत्या 6 ते 15 जानेवारीदरम्यान सावगाव रोड, नानावाडी येथील अंगडी इंजिनियरिंग कॉलेजच्या पटांगणावर अन्नोत्सव भरविला जाणार आहे.
अन्नोत्सवाचे उद्घाटन 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वा. होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष बसवराज विभुती व सेक्रेटरी अक्षय कुलकर्णी यांनी दिली. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अन्नोत्सव आकर्षित करतो. नागरिकांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ चाखता यावेत यासाठी 1997 मध्ये रोटरी क्लबने पहिल्यांदा अन्नोत्सवाचे आयोजन केले. मागील 25 वर्षांपासून अन्नोत्सव भरविला जात आहे.
अन्नोत्सवासाठी उत्तम दर्जाचा सेटअप तयार करण्यात आला आहे. यावर्षी देशभरातील खाद्य संस्कृती दाखविणारे 200 हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. काश्मीर ते जयपूर तसेच गोवा, कोल्हापूर, सातारा, पुणे, दिल्ली येथील अनेक खाद्यपदार्थ खवय्यांना चाखता येतील. इव्हेंट चेअरमन पराग भंडारे यांच्या नेतृत्वाखाली योगेश कुलकर्णी, मनोज पै हे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
अन्नोत्सवामध्ये खाद्यपदार्थांच्या स्टॉलसोबत दररोज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 800 हून अधिक कार व हजारो दुचाकी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मोठ्या एलईडी स्क्रिनद्वारे कार्यक्रमांची माहिती प्रत्येक खवय्यांपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दररोज 15 हजार खाद्यप्रेमी भेट देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे अन्नोत्सव भरवता आला नव्हता. परंतु यावर्षी अन्नोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
अन्नोत्सवमधून मिळालेला निधी सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. शाळा, स्वच्छतागृह, ऊग्णवाहिका, नेत्रपेढी, स्कीन बँक, डायलेसिस सेंटर, पोलिओ
व्हॅक्सिनसाठी फ्रीज यासह इतर साहित्य दिले जाणार आहे. यावर्षी गायन, नृत्य, खाद्यपदार्थ निर्मिती, मिस्टर बेळगाव यासह विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.









