पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद
प्रतिनिधी/ बेळगाव
देशभरातील चमचमीत खाद्यपदार्थांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोटरी अन्नोत्सवाला शनिवारपासून बेळगावच्या सीपीएड मैदानावर थाटात सुरुवात झाली. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडन्ट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते अन्नोत्सव 2023 चे उद्घाटन करण्यात आले. यावर्षी अन्नोत्सवमध्ये कर्नाटकासह काश्मीर, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश येथील खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आल्याने बेळगावच्या खवय्यांना ही एक पर्वणी ठरणार आहे.
रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर यांनी उपस्थितांचे स्वागत करत अन्नोत्सवाच्या आयोजनाविषयाचा उद्देश स्पष्ट केला. ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी रोटरी परिवाराला शुभेच्छा देत आपण 38 वर्षांपासून रोटरी व रोट्रॅक्टच्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी असल्याचे सांगितले. अन्नोत्सवामुळे देशभरातील खाद्यपदार्थ नागरिकांना एकाच ठिकाणी चाखता येतात. त्यामुळे असे महोत्सव प्रत्येक शहरामध्ये झाले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
इव्हेंट चेअरमन डॉ. संतोष पाटील म्हणाले, 27 वर्षांपासून बेळगावमध्ये रोटरी अन्नोत्सव आयोजित केला जात आहे. प्रत्येक वर्षी यामध्ये नाविन्यता आणली जात आहे. यावर्षी 185 स्टॉल असून 90 गृहोपयोगी साहित्य तर 95 स्टॉल खाद्य पदार्थांचे आहेत. याबरोबरीनेच लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुरू करण्यात आले आहे. ऑटोमोबाईल, गृहोपयोगी वस्तु, विमा, हॉस्पिटल असे अनेक स्टॉल अन्नोत्सवमध्ये असून नागरिकांनी त्यांचा आस्वाद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ बेळगावचे सचिव मनोज मायकल, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर तुषार पाटील, उपप्रांतपाल रेणू कुलकर्णी, इव्हेंट चेअरमन डॉ. संतोष पाटील, सुनिश मेत्राणी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी अन्नोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी हलक्यापुलक्या खाद्यपदार्थांसोबत शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांवर ताव मारला.
चौकट करणे
बच्चन यांच्या गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
उद्घाटन सोहळ्यानंतर महानायक अभिताभ बच्चन यांच्या जीवनावर आधारित हिंदी मेलोडी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. जुन्या काळातील अजरामर गाणी सादर करून बच्चन यांचा जीवनपट उलगडण्यात आला. यातील अनेक गाण्यांना नागरिकांनी टाळ्यांची दाद दिली. चमचमीत खाद्यांचा आस्वाद घेतानाच बच्चन यांच्या गाण्यांचा मनमुराद आनंद लुटण्यात आला.









