14 जानेवारीपर्यंत चालणार अन्नोत्सव : लाखांहून अधिक खाद्यप्रेमी भेट देण्याची अपेक्षा
बेळगाव : देशभरातील चटपटीत व चमचमीत खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी मिळणाऱ्या ‘रोटरी अन्नोत्सव-2025’ ला शुक्रवारी मोठ्या थाटात प्रारंभ झाला. सावगाव रोड येथील अंगडी कॉलेजच्या मैदानावर रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने अन्नोत्सव भरविण्यात आला आहे. बेळगावच्या माजी खासदार मंगला अंगडी व सुरेश अंगडी एज्युकेशन फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. स्फूर्ती अंगडी यांच्या हस्ते अन्नोत्सवाचे उद्घाटन झाले. रोटरीचे प्रांतपाल शरद पै यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडला.
रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने 3 ते 14 जानेवारी दरम्यान अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी एक लाखाहून अधिक खाद्यप्रेमी अन्नोत्सवाला भेट देतील, अशी अपेक्षा आयोजकांना आहे. खाद्यपदार्थांच्या आस्वादासोबतच मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल आहे. पहिल्याच दिवशी हिंदी गाण्यांचा नजराणा सादर करण्यात आला. शाकाहारीसह मांसाहारी खाद्यपदार्थ चाखण्यासाठी शुक्रवारी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष सुहास चांडक, इव्हेंट चेअरमन अक्षय कुलकर्णी, शैलेश मंगळे, मनीषा हेरेकर यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्नोत्सवपर्यंत पोहोचण्यासाठी तीन रस्ते उपलब्ध आहेत. नानावाडी मार्गे सावगाव रोड, राणी चन्नम्मानगरमार्गे मंडोळी रोड व विजयनगर-महालक्ष्मीनगर मार्गे अन्नोत्सवाला पोहोचता येते.
आज विविध मनोरंजन कार्यक्रम
अन्नोत्सवामध्ये केवळ बेळगावच नाही तर दक्षिण कर्नाटक, गोवा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, दिल्ली, राजस्थान यांच्यासह देशभरातील विविध खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर गृहोपयोगी वस्तूही उपलब्ध असल्याने महिलांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. शनिवार दि. 4 रोजी ‘सांज द बँड’तर्फे लाईव्ह परफॉर्मर्स देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बॉलिवूडमधील गाण्यांचा आस्वाद नागरिकांना घेता येईल.









