कोल्हापूर :
जिल्ह्यातील जोतिबा – पन्हाळा, गगनगिरी मंदिर व विशाळगड अशा तीन ठिकाणी रोप वे करायला राज्य शासनाकडून तत्वता मान्यता मिळाली असून या रोप वे मुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची दैनंदिन सरासरी संख्या 20 हजार आहे. सुट्टीच्या दिवसात हीच संख्या 50 ते 60 हजारांच्या घरात जाते. जोतिबाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची दैनंदिन संख्याही पाच हजारांच्या घरात आहे. रविवार आणि अन्य सुट्टीच्या दिवशी हीच संख्या 10 ते 15 हजारांच्या घरात जाते. यात्रा आणि अन्य सणवारावेळी हाच आकडा पन्नास हजार ते लाखापर्यंत जातो. जोतिबाच्या दर्शनाला पन्हाळ्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची रोजची संख्याही पाच हजारांच्या घरात आहे. अनेक भाविक आणि पर्यटक एकाचवेळी अंबाबाई–जोतिबा–पन्हाळा असे सफर करत असतात. या सगळ्या भाविक–पर्यटकांसाठी हा जोतिबा–पन्हाळा रोप वे फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर होणारा दुसरा रोप वे हा विशाळगडावर होत आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.
किल्ले विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून या किल्ल्याला नैसर्गिकरित्याच दुर्गमतेच कवच लाभले आहे. विशाळगडाला जाण्यासाठी आपण एसटी बस किंवा खाजगी वाहनाने वाहनतळावर उतरताच किल्ल्याच्या पायथ्याला एक दरी आहे. पूर्वी या दरीत उतरूनच किल्ल्यावर जावे लागत असे, पण आता लोखंडी पूल बांधल्यामुळे ही वाट सोपी झाली आहे. या पूलावरून किल्ल्याच्या पायथ्याशी उतरल्यावर आपल्यासमोर दोन मार्ग दिसतात. एक म्हणजे थेट समोरच्या खडकात खोदलेली शिडी, जी किल्ल्याच्या शिखरावर पोहोचण्याचा सर्वात थेट मार्ग आहे. दुसरा मार्ग म्हणजे उजव्या बाजूला असलेल्या पायऱ्यांची फिरती वाट, जी थोडी लांब असली तरी सहज चढण्यासाठी सोयीची आहे. जसा आता लोखंडी पूल आहे तसा तिथे रोप वे होणार असल्याने येणाऱ्या पर्यटकाला थेट वाहनतळावरुन गडावर जाता येणार आहे. तेही दरीतून जाताना निसर्ग पाहता येणार असल्याने पर्यटक रोप वे ला पसंती देतील.
गगनगिरी मंदिरामध्ये नेहमी भक्तांची वर्दळ असते. पायऱ्यावरुन सध्या गडावर जाता येत असून गडावर प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस लेणी आहेत. ही लेणी म्हणजे गडाच्या प्राचिनतेचे प्रतीकच आहे, पण सध्या या लेण्याचे मंदिरात रुपांतर केले आहे. गडाच्या मधल्या टप्प्यावर आलो की, एक मोठे पठार लागते. या पठारावर आलो की, अंगाला झोंबणारा गारवारा आपले स्वागत करतो. यापुढे गडाच्या बालेकिल्ल्याची चढण सुरू होते. बालेकिल्ल्याच्या खालच्या अंगास एक छोटी टेकडी असून त्यावर छोटेखानी महादेव मंदिर आहे. जुन्या पायऱ्यांच्या वाटेने वर येतानाच दरवाजाचे अवशेष दिसतात. वर गहिनीनाथांचे मंदिर आहे. या गगनबावड्यातील गगनगिरी मंदिरसह जिह्यातील तीन ठिकाणी रोप–वे होणार आहेत. राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापनाच्या वतीने हे मार्ग उभारण्यात येणार आहेत. त्यांना जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचाही निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
- महत्त्व वाढणार…
रोप-वे मुळे जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिकस्थळांचे महत्त्व वाढणार असून, त्यामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा ‘एनएचएलएमएल’ला 30 वर्षांच्या भाडेपट्टीवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नात सरकारचा हिस्सा राहणार आहे.








