वृत्तसंस्था/ नेपल्स (इटली)
ब्रिटनचा फुटबॉलपटू हॅरी केनने आपल्याच देशाचा माजी कर्णधार वेन रुनीचा राष्ट्रीय संघाकडून खेळताना नोंदविलेला सर्वाधिक गोलांचा विक्रम मोडीत काढला. युरोपियन चॅम्पियनशीप स्पर्धेतील इटलीमध्ये झालेल्या गुरुवारच्या इटलीविरुद्धच्या सामन्यात हॅरी केनने आपला 54 वा गोल नोंदविला.
इटली आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना चुरशीचा झाला. इंग्लंडतर्फे हॅरी केनने पेनल्टीवर हा गोल केला. मध्यंतरापर्यंत इंग्लंडने इटलीवर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. 2015 साली हॅरी केनने इंग्लंड संघाकडून आपले आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात पदार्पण केले होते. तर माजी कर्णधार वेन रुनीने 2003 ते 2018 अशा पंधरा वर्षांच्या कालावधीत इंग्लंडचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले होते.
रोनाल्डोचा आगळा विक्रम
पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा नवा विक्रम केला आहे. लिस्बनमध्ये गुरुवारी झालेल्या युरोपियन चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेसाठीच्या पात्रफेरीच्या सामन्यात रोनाल्डोने पोर्तुगालचे प्रतिनिधित्व केले होते. रोनाल्डोचा हा पोर्तुगाल संघाकडूनचा 197 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. पोर्तुगाल आणि लिचटेनस्टेन यांच्यात हा सामना खेळविला गेला होता. यापूर्वी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम कुवेतच्या बादेर अल मुतवा याच्या नावावर होता. मुतवाने 196 सामने खेळले आहेत. गेल्या वषी कतारमध्ये झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्को विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोर्तुगालला पराभव पत्करावा लागला होता.









