वृत्तसंस्था/ अबहा (सौदी अरेबिया)
सौदी सुपर चषक फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात अल हिलाल क्लबने रोनाल्डोच्या अल नस्र क्लबचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डो सौदी अरेबियातील अल नस्र क्लबकडून खेळत आहे. या सामन्यात 39 वर्षीय रोनाल्डोने आपल्या संघातर्फे एकमेव गोल नोंदविला. सौदी सुपर चषक स्पर्धेत गेल्या हंगामात रोनाल्डोने 35 गोल नोंदविले होते. शनिवारच्या सामन्यात त्याने 44 व्या मिनिटाला आपल्या संघाचे खाते उघडले. 55 व्या मिनिटाला सेव्हिकने अल हिलाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या सामन्यात उत्तरार्धातील खेळाच्या 17 मिनिटांच्या कालावधीत अल हिलालने 4 गोल केले. मिट्रोव्हिकने अल हिलालतर्फे 2 गोल केले. तर ब्राझीलच्या माल्कमने अल हिलालचा चौथा गोल केला.









