वृत्तसंस्था / बुचारेस्ट (रुमानिया)
रुमानियाची आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटू तसेच दोनवेळा ग्रॅँडस्लॅम अजिंक्यपद मिळविणारी 33 वर्षीय सिमोना हॅलेपने शुक्रवारी येथे आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली. येथे सुरू असलेल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत तिला पराभव स्वीकारावा लागला. यानंतर तिने निवृत्तीची घोषणा केली.
बुचारेस्टमधील महिलांच्या टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीच्या सामन्यात लुसिया ब्राँझेटीने हॅलेपचा 6-1, 6-1 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडत विजयी सलामी दिली. या स्पर्धेमध्ये हॅलेपला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत हॅलेपला वारंवार स्नायु दुखापतीने चांगलेच दमविले होते. 2019 साली हॅलेपने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा तर 2018 साली फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती.









