वृत्तसंस्था / पुणे
2024 च्या हंगामातील येथे सुरू असलेल्या 11 व्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सामन्यात बंगाल वॉरियर्सने युपी योद्धासला 31-31 असे बरोबरीत रोखले. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला.
प्रणय राणेने सुपर 10 गुण तसेच नितीशकुमारने 5 गुण मिळविल्याने बंगाल वॉरियर्स संघाने 3 गुणांची आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर गगन गावडाने सुपर 10 गुण नोंदविल्याने युपी योद्धास संघाने शेवटच्या क्षणी हा सामना बरोबरीत सोडविला. युपी योद्धासच्या गगनगौडा आणि भवानी रजपूत यांच्या चढाया अप्रतिम ठरल्याने युपी योद्धासला गुण झडपट मिळाले. पण त्यानंतर सिद्धेश तटकरेच्या खेळीने पुन्हा दोन्ही संघ बरोबरीत राहिले. सामन्यातील पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत बंगाल वॉरियर्सचे पारडे जड वाटत होते. पण त्यानंतर युपी योद्धासने बंगाल वॉरियर्सवर किरकोळ आघाडी मिळविली. सामन्याच्या मध्यंतरावेळी बंगाल वॉरियर्सने युपी योद्धासवर 15-13 अशी दोन गुणांची बढत मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर प्रणय राणेच्या मजबूत पकडीने बंगाल वॉरियर्सने दोन गुणांची आघाडी मिळविली होती. त्यानंतर युपी योद्धासने बंगाल वॉरियर्सचे सर्वगडी बाद केले. गगनगौडाच्या या कामगिरीमुळे युपी योद्धास संघाला पुन्हा आघाडी घेण्याची संधी मिळाली होती. युपी योद्धासचा संघ यावेळी तीन गुणांनी आघाडीवर होती. विश्वासच्या शानदार पकडीमुळे बंगाल वॉरियर्सने 30-30 अशी बरोबरी साधली. शेवटच्या मिनिटाला दोन्ही संघांनी 31-31 अशी समान गुंणांची नोंद केल्याने हा सामना बरोबरीत राहिला.









