दुर्मिळ लाकडाने निर्मित शवपेटीने वेधले लक्ष
संघर्षासाठी ओळखल्या जाणाऱ्या गाझापट्टीत पॅलेस्टिनी संशोधकांना रोमन युगातील दफनभूमीत अनेक प्राचीन थडगी आणि दुर्मिळ लाकडाने निर्मित दोन शवपेट्या आढळून आल्या आहेत. हे स्थळ सुमारे 200 वर्षे जुने असून पुरातत्व तज्ञ याला गाझामध्ये आढळून आलेली आतापर्यंतची सर्वात मोठी दफनभूमी ठरवत आहेत.

मागील वर्षी उत्तर गाझापट्टीमध्ये जबालियानजीक इजिप्तकडून अर्थसहाय्यप्राप्त एका गृह योजनेच्या कार्यादरम्यान या पुरातत्व स्थळाचा शोध लागला होता. येथे फ्रेंच तज्ञांच्या सहकार्याद्वारे 2,700 चौरस मीटरक्षेत्रात उत्खनन करण्यात आले आहे. पुरातत्व तज्ञांसाठी हे स्थळ आता ‘सोन्याची खाण’ ठरत आहे. या स्थळावर जानेवारी महिन्यात 60 थडग्यांचा शोध लागला होता. परंतु आता ही संख्या वाढून 135 झाल्याची माहिती पुरातत्व तज्ञांनी दिली आहे.
संशोधकांनी 100 हून अधिक थडग्यांचे अध्ययने केल्याचे उत्खननाचे नेतृत्व करणारे फ्रेंच पुरातत्व तज्ञ रेने एल्टर यांनी सांगितले आहे. एका शवपेटीवर द्राक्षाची पाने कोरण्यात आली आहेत, तर दुसऱ्या शवपेटीवर डॉल्फिनचे चित्र कोरण्यात आले आहे. हा एक असाधारण शोध आहे. गाझामध्ये पहिल्यांदा अशाप्रकारचा शोध लागल्याचे एल्टर यांनी म्हटले आहे.









