बसमधून प्रवास : इतर प्रवाशांची गैरसोय, प्रवाशीसंख्येत वाढ : अतिरिक्त बसेस सोडण्याची मागणी
बेळगाव : रोजगार हमी योजनेंतर्गत कामांना प्रारंभ झाला आहे. काही ठिकाणी कामगारांना इतर ठिकाणी काम देण्यात आले आहे. प्रवासासाठी परिवहन मंडळाच्या बसचा आधार घेतला जात आहे. महिला प्रवाशीसंख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे रोजगार हमीचा बोजा शक्तीवर पडताना दिसत आहे. रोहयोतील कामगारांना कामासाठी विविध ठिकाणी जावे लागत आहे. दरम्यान, प्रवासासाठी बसचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. आधीच शक्ती योजनेमुळे चेंगराचेंगरी करत प्रवास करावा लागत आहे. त्यातच रोहयो महिलांची भर पडल्याने बसचा प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे. शक्ती योजना सुरू झाल्यापासून बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता काही प्रवाशांना खासगी वाहतूक सोयीस्कर वाटू लागली आहे.
सामान्य प्रवाशांची गैरसोय
रोहयो कामगारांना गावापासून 5 ते 10 कि.मी. अंतरावर काम दिले जात आहे. यासाठी कामगार बसचा प्रवास करत आहेत. त्यामुळे बसमध्ये रोहयो प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे इतर सामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही बसथांब्यांवर रोहयो कामगारांची संख्या अधिक दिसत आहे. शिवाय येत्या काळात रोहयो कामांचा विस्तार अधिक वाढणार आहे. त्यामुळे रोहयो कामगारांच्या संख्येतही वाढ होणार आहे. इतर ठिकाणी कामे दिल्यास पुन्हा बसवर अतिरिक्त प्रवाशांचा ताण वाढणार आहे. यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र रोहयो कामाची मागणी वाढली आहे. स्थानिक पातळीवर कामे उपलब्ध नसल्यास इतर ठिकाणी कामे उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे रोहयो कामांसाठी कामगारांची ये-जा वाढली आहे. रोहयो कामगारांमध्ये महिला कामगारांची संख्या अधिक आहे.
विद्यार्थ्यांना मात्र त्रास
महिला रोहयो कामगार शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत. मात्र, बसची कमतरता असल्याने दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे. इतर प्रवासी आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहनने अतिरिक्त बसेस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.









