दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच : आमदारांना निवेदन
खानापूर : गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असलेले वेतन देण्यात यावे यासाठी रोहयो कर्मचाऱ्यांनी सोमवारी तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले. मंगळवारी दुसऱ्या दिवशी कामबंद आंदोलन करून सहा महिन्यांचे थकीत वेतन तातडीने देण्यात यावे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सुविधा मनरेगा कर्मचाऱ्यांना मिळाव्यात, अशा मागणीचे निवेदन आमदार विठ्ठल हलगेकर यांना देण्यात आले. आमदारांनी निवेदनाचा स्वीकार करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
तालुक्यात रोहयो योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका पंचायत माध्यमातून 54 कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. राज्यभरात सोमवारपासून कामबंद आंदोलन हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही रोहयो कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. यावेळी आमदारांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावेळी महांतेश जंगटी, साताप्पा इरगार, शशिधर सत्तीगेरी, गणेश अलबादी, महांतेश बाळेकुंद्री, दर्शन शिवण्णावर यांच्यासह सर्व रोहयो कर्मचारी सहभागी झाले होते.









