पावसाअभावी भीषण परिस्थिती निर्माण : तातडीने कामे सुरू करण्याची मागणी : अतिरिक्त दिवस कामाची अपेक्षा
बेळगाव : जिल्ह्यात पावसाअभावी भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांना मनरेगा आधार ठरणार आहे. दरम्यान शासनाने दुष्काळी भागात कामाचे अतिरिक्त मनुष्य दिवस निर्माण करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे मनरेगा कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय तातडीने रोहयोअंतर्गत कामांना चालना द्यावी, अशी मागणीही कामगारांतून होऊ लागली आहे. जिल्ह्यात 7 लाखांहून अधिक जॉब कार्डधारक आहेत. दरम्यान भीषण दुष्काळ निर्माण झाल्याने जॉब कार्डधारकांच्या आशा आता रोहयो कामाकडे लागून आहेत. अकुशल कामगारांसाठी रोहयो लाभदायक ठरली आहे. त्यामुळे दरवर्षी जॉबकार्ड धारकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. रोहयोअंतर्गत तलाव, नदी, नाले, विहिरी, गटारी, रस्ते, वृक्ष, रोप लागवडीसाठी खोदाई आदी कामे केली जात आहेत. त्यामुळे हाताला काम उपलब्ध होऊ लागले आहे. शासनाकडून एका कुटुंबाला 100 दिवस काम देणे बंधनकारक आहे. मात्र काही ग्राम पंचायती काम उपलब्ध नाही किंवा इतर काही कारणास्तव कमी दिवस काम देत आहेत. त्यामुळे रोहयो कामासाठी दूरवर जावे लागत आहे.
जिल्ह्यात अडीच लाखांहून अधिक क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. खरीप हंगामातील भात, ऊस, सोयाबिन, भुईमूग, कापूस, मका आदी पिकांना फटका बसला आहे. शिवाय रब्बी हंगाम पावसाअभावी रखडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पसरली आहे. संपूर्ण पीक वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रोहयोच आधार ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि कष्टकऱ्यांतून रोहयोअंतर्गत काम देण्याबाबत जोरदार मागणी होऊ लागली आहे. दरवर्षी डिसेंबरनंतर रोहयोअंतर्गत विविध ठिकाणी कामांना चालना दिली जाते. मात्र यंदा दुष्काळामुळे आतापासूनच कामांना चालना द्यावी, अशी मागणी होत आहे. स्थानिक पातळीवर आराखडा तयार करण्यासाठी स्थानिक ठिकाणीच काम उपलब्ध करावे, अशी मागणीही होऊ लागली आहे. सध्या पावसाअभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कामगारांना धीर देण्यासाठी रोहयोअंतर्गत कामे द्यावीत, अशी मागणी होत आहे.









