दिल्लीच्या पाटा खेळपट्टीवर भारताचा अफगाणवर आठ गडी राखून विजय : शतकवीर रोहित शर्मा सामनावीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत अरुण जेटली स्टेडियमवर कर्णधार रोहित शर्माचे वादळी शतक आणि विराट कोहलीचा फिनिशिंग टच या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट आणि 15 षटके राखून पराभव केला. अफगाणने दिलेले 273 धावांचे आव्हान भारताने 35 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताचा वर्ल्डकपमधील सलग दुसरा विजय ठरला आहे. आता, भारताचा पुढील सामना 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध अहमदाबाद येथे होईल. विशेष म्हणजे, या सामन्याचा हिरो ठरला तो कर्णधार रोहित शर्मा. त्याने या लढतीत सचिन तेंडुलकर, कपिल देव, ख्रिस गेल यांचे चार विक्रम मोडित काढले.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमच्या सपाट खेळपट्टीवर भारताच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 272 धावांत रोखले. यानंतर रोहित शर्माने वादळी फलंदाजी करत हे आव्हान सहज पार करण्यास सिंहाचा वाटा उचलला. 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि ईशान किशन यांनी वादळी सुरुवात केली. विशेषकरुन रोहितने धावांचा पाऊस पाडला. रोहितपुढे अफगाणिस्तानची गोलंदाजी अतिशय दुबळी आणि कमकुवत जाणवत होती. या जोडीने अवघ्या 18.4 षटकात 156 धावांची सलामी दिली. ईशानचे अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकले. त्याने 47 चेंडूत 47 धावांची खेळी साकारली.
रोहितचे अवघ्या 63 चेंडूत शतक
ईशान बाद झाल्यानंतर रोहित आणि विराट कोहलीने डाव सावरला. या जोडीने 49 धावांची भागीदारी साकारली. दरम्यान, रोहितने अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकत अनेक विक्रमांना गवसणी घातली. विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक शतकांचा विक्रम केला. सर्वाधिक षटकार यासह अनेक विक्रम रोहित शर्माने केले. त्याने 84 चेंडूत 16 चौकार व 5 षटकारासह 131 धावांची वादळी खेळी साकारली. त्याच्या आक्रमक खेळीपुढे अफगाण गोलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. राशीद खानने बोल्ड करत त्याची खेळी संपुष्टात आणली. यानंतर विराट आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागिदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विराटने 6 चौकारासह नाबाद 55 तर श्रेयस अय्यरने नाबाद 25 धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाण संघाची सुरुवात चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराहने 7 व्या षटकात इब्राहिम झद्रनला (21) बाद करत अफगाणला पहिला धक्का दिला. यानंतर 13 व्या षटकात रहमानउल्ला गुरबाजच्या रूपाने अफगाण संघाने दुसरी विकेट गमावली. 21 धावांची इनिंग खेळल्यानंतर गुरबाज हार्दिक पंड्याचा बळी ठरला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला रहमत शाहदेखील फार काळ टिकला नाही. त्याने 3 चौकारासह 16 धावा फटकावल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई यांच्या शानदार खेळीमुळे संघाला चांगली धावसंख्या गाठण्यात यश आले. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अजमतुल्ला उमरझाई यांनी चौथ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. या जोडीने एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. कर्णधार शाहिदीने 88 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह 80 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली तर अजमतुल्ला उमरझाईने 69 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारासह 62 फटकावल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर शेवटी राशीद खान (12 चेंडूत 16) आणि मोहम्मद नबीने (27 चेंडूत 19) धावा केल्या, यामुळे अफगाण संघाला 50 षटकांत 8 बाद 272 धावापर्यंत मजल मारता आली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 39 धावात देत 4 बळी घेतले तर बर्थडे बॉय हार्दिक पंड्याने 43 धावांत दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान 50 षटकांत 8 बाद 272 (गुरबाज 21, इब्राहिम झद्रन 22, रेहमत शाह 16, हशमतउल्लाह शाहिदी 80, उमरझाई 62, मोहम्मद नाबी 19, राशीद खान 16, बुमराह 39 धावांत 4 बळी, हार्दिक पंडया 43 धावांत 2 बळी).
भारत 35 षटकांत 2 बाद 272 (रोहित शर्मा 84 चेंडूत 16 चौकार व 5 षटकारासह 131, इशान किशन 47 चेंडूत 47, विराट कोहली 55 चेंडूत नाबाद 55, श्रेयस अय्यर नाबाद 25, राशीद खान 57 धावांत 2 बळी).









