पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर भारताला 144 धावांची आघाडी, मर्फीचे 5 बळी
वृत्तसंस्था/ नागपूर
दर्जेदार ऑस्ट्रेलियन माऱयासमोर दबावाखाली कर्णधार रोहित शर्माने नोंदवलेले शानदार शतक, अष्टपैलू रवींद्र जडेजा व अक्षर पटेल यांनी नोंदवलेली नाबाद अर्धशतके यामुळे भारताने पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियावर पूर्ण वर्चस्व मिळविले. दिवसअखेर भारताने पहिल्या डावात 7 बाद 321 धावा जमवित ऑस्ट्रेलियावर 144 धावांची महत्त्वाची आघाडी घेतली आहे.
कर्णधार रोहितने उच्च दर्जा व संयम दाखवत कसोटीतील एक अत्यंत प्रभावी शतक नोंदवले आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक नोंदवणारा पहिला भारतीय कर्णधार होण्याचा विक्रमही नोंदवला. रोहितचे हे शतक सुवर्णमोलाचे असले तरी जडेजाचे नाबाद अर्धशतकही तितकेच अनमोल आहे. सामन्याच्या संदर्भात त्याची ही खेळी तितकीच महत्त्वाची मानली जाईल. सहाव्या गडय़ासाठी त्याने रोहितसमवेत 61 धावांची तर त्यानंतर अक्षर पटेलसमवेत आठव्या गडय़ासाठी अभेद्य 81 धावांची भर घालून आपली योग्यता पुन्हा एकदा दाखवून दिली. अक्षर पटेलनेही 52 धावांची नाबाद व जलद खेळी करीत आघाडी वाढविण्यास मोलाची मदत केली आहे.

रोहितचे दर्जेदार शतक
भारतीय फलंदाजांसाठी ही कौशल्याची कसोटीच होती, विशेषतः रोहित व जडेजासाठी. दुसऱया दिवशी भारताने 244 धावा जमविल्या. पहिल्या दिवसापेक्षा संथ झालेल्या खेळपट्टीवर इतर फलंदाज धावा जमविण्यासाठी झगडत असताना कर्णधार रोहित अतिशय एकाग्रतेने फलंदाजी करीत मौल्यवान शतक नोंदवले. 2021 मध्ये चेन्नई कसोटीत त्याने 161 धावांची खेळी होती, त्याच दर्जाची ही खेळीही आहे. नाथन लियॉन व टॉड मर्फी यांच्या नेतृत्वाखालील फिरकी माऱयासमोर रोहितने सर्वोत्तम पाऊलच पुढे टाकले, असे म्हणावे लागेल. खूप मेहनत केलेल्या मर्फीने मात्र पदार्पणाच्या कसोटीतच 5 बळी मिळविण्याचा पराक्रम केला.

दोन्ही ऑफस्पिनर्सही राऊंड द विकेट मारा करीत धावा रोखण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अंशतः यशही आले. त्यामुळे रोहितला शतकी मजल मारण्यासाठी 171 चेंडू लागले. सुमारे साडेचार तासांच्या खेळीत त्याने 15 चौकार, 2 षटकार मारले. पण स्ट्राईक रोटेट करणे आणि सावधगिरी राखत पत्करलेली जोखीम ही त्याच्या या खेळीची वैशिष्टय़े ठरली. त्याने खेळपट्टीचे अचूक वाचन केल्याने आपल्या नैसर्गिक आक्रमक वृत्तीला आवर घातला आणि आपल्यातील ‘चेतेश्वर पुजारा’ला पुढे आणले. त्याची साक्ष म्हणजे त्याच्या वृत्तीविरुद्ध दोन सत्रात नोंदवलेल्या 62 धावा. गुरुवारी त्याने अर्ध्या सत्रातच 56 धावा फटकावल्या होत्या. पुल हा रोहितचा आवडता शॉट आणि प्रत्येक फॉरमॅटमध्ये तो हा फटका वापरतोच. पण यावेळी त्याने संयम राखत कमिन्सविरुद्ध फक्त एकदाच तो फटका वापरला. एकदाच त्याने त्याला पुलचा षटकार मारला. त्याने शतकासाठीही घाई केली नाही. काही षटके निर्धाव खेळून काढली आणि एकेरी धावांवर जास्त भर दिला. मात्र शतकासमीप आल्यानंतर कमिन्सला त्याने स्क्वेअरलेगला शानदार चौकार लगावत नव्वदी गाठली. नंतर त्याने एक्स्ट्रॉ कव्हरवरून मर्फीला इनसाईड आऊड लोफ्टेड ड्राईव्हचा चौकार मारत शतक पूर्ण केले आणि प्रतिकूल परिस्थितीत उच्च दर्जाचे कौशल्य असणारी व्यक्तीच यशस्वी ठरते, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. त्याने सेलेब्रेशनही साधेपणानेच केले. हेल्मेट काढून सर्वाना अभिवादन करीत त्याने मानवंदना स्वीकारली.
दुसऱया नव्या चेंडूवर कमिन्सने एका अप्रतिम चेंडूवर रोहितला बाद केले. टप्पा पडल्यानंतर चेंडू उशिराने किंचित बाहेर मूव्ह झाला आणि चेंडूने त्याचा त्रिफळा उडविला. नंतर जडेजाने ताबा घेत अक्षरच्या साथीने आघाडी वाढवण्याचे काम चोखपणे पार पाडले. विराट कोहली (12) आणि पदार्पणवीर सूर्यकुमार यादव (8) व कोना भरत (8) यांनी मात्र निराशा केली. कोहलीला पुजाराला पडलेला चेंडूसारखाच चेंडू मर्फीने टाकला. त्याने लेगसाईडला पाचव्या स्टंपच्या दिशेने चेंडू टाकला. त्याला फटकावताना कोहलीच्या बॅटचा हलका स्पर्श झाला आणि यष्टिरक्षक कॅरेने दोन प्रयत्नात त्याचा झेल टिपला. सूर्या हा लियॉनचा पहिला बळी ठरला. त्याने एका अप्रतिम चेंडूवर सूर्याचा बचाव भेदत त्रिफळा उडविला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प.डाव 63.3 षटकांत सर्व बाद 177.
भारत प.डाव 114 षटकांत 7 बाद 321ः रोहित शर्मा 120 (21 चेंडूत 15 चौकार, 2 षटकार), केएल राहुल 20 (71 चेंडूत 1 चौकार), अश्विन 23 (62 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), पुजारा 7, कोहली 12, सूर्यकुमार 8, जडेजा खेळत आहे 66 (170 चेंडूत 9 चौकार), श्रीकर भरत 8, अक्षर पटेल खेळत आहे 52, अवांतर 5. गोलंदाजी ः कमिन्स 1-74,, लियॉन 1-98, मर्फी 5-82.
मॅथ्यू रेनशॉ पूर्ण फिट
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू रेनशॉ दुसऱया दिवशी सकाळी सामन्याआधी सराव करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याला ताबडतोब स्कॅनिंगसाठी नेण्यात आले. पण त्याला दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो पुन्हा मैदानात दाखल झाल्याने ऑस्ट्रेलियन कॅम्पला हायसे वाटले. त्याची फिटनेस टेस्ट घेतल्यानंतर तो मैदानात येईपर्यंत ऍश्टन ऍगरने त्याच्या जागी काही काळ क्षेत्ररक्षण केले.









