वृत्तसंस्था / दुबई
2024 च्या क्रिकेट हंगामातील आयसीसीच्या पुरुषांच्या सर्वोत्तम टी-20 संघाची घोषणा करण्यात आली असून या संघाच्या नेतृत्वपदी भारताचा कर्णधार रोहीत शर्माची निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या या संघामध्ये भारताच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंग, अष्टपैलु हार्दीक पांड्या यांना या संघात संधी देण्यात आली आहे.
आयसीसीने घोषित केलेल्या या संघामध्ये ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हीस हेड, इंग्लंडचा फिल सॉल्ट, पाकचा बाबर आझम, विंडीजचा निकोलास पुरन, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, अफगाणचा रशीद खान आणि लंकेचा हसरंगा यांचा समावेश आहे.
रोहीत शर्माने 2024 च्या क्रिकेट हंगामात टी-20 प्रकारात दर्जेदार कामगिरी करताना 11 सामन्यात 378 धावा झोडपल्या आहेत. तसेच त्याने या कालावधीत भारताला आपल्या नेतृत्वाखाली आयसीसीच्या टी-20 विश्वचषक मिळवून दिला. भारतीय संघातील अष्टपैलु हार्दीक पांड्याची या कालवधीतील कामगिरी निश्चितच कौतुकास्पद झाली. त्याने 17 सामन्यात फलंदाजीत 352 धावा आणि गोलंदाजीत 16 गडी बाद केले. तो आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 अष्टपैलुंच्या मानांकनात अग्रस्थानावर आहे. जसप्रित बुमराहने टी-20 प्रकारात या कालावधीत आपले दमदार पुनरामगन करताना 8 सामन्यात 15 गडी बाद केले. मात्र भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याची कामगिरी अधिक उठावदार झाली. त्याने 2024 च्या क्रिकेट हंगामात टी-20 प्रकारात 18 सामन्यात 13.50 धावांच्या सरासरीने 36 गडी बाद केल्याने त्याची 2024 च्या कालावधीतील आयसीसीच्या सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटूंसाठी निवड करण्यात आली.









