अफगाणविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा : संजू सॅमसन, शिवम दुबेलाही संधी
वृत्तसंस्था/ मुंबई
11 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या अफगाणविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रविवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. तब्बल 14 महिन्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहलीचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय, संजू सॅमसन, शिवम दुबे व अक्षर पटेललचीही संघात वर्णी लागली आहे. उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका रंगणार असून या मालिकेतील पहिला सामना दि. 11 रोजी मोहाली येथे होईल.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मागील 14 महिन्यांमध्ये एकही टी-20 सामना खेळला नाही आहे. 2022 मधील टी-20 विश्वचषकामध्ये इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना गमावल्यानंतर दोन्ही दिग्गज अद्याप एकही टी-20 सामना खेळलेला नाही. पण आगामी टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. अर्थात, अफगाणविरुद्ध मालिकेसाठी रोहितकडे नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे.
सॅमसन, दुबेला संधी, सूर्यकुमार, हार्दिक मालिकेला मुकणार
हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाहीत. याशिवाय, ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड देखील या मालिकेत दिसणार नाहीत. ईशानच्या जागी निवड समितीने संजू सॅमसनवर विश्वास दाखवताना त्याला संघात स्थान दिले आहे. याशिवाय, शिवम दुबे, अक्षर पटेलचीही संघात वर्णी लागली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत जबरदस्त गोलंदाजी केल्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली गेली आहे. गोलंदाजीची धुरा रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार यांच्यावर असणार आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा यालाही विश्रांती दिली गेली आहे.
अफगाणविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक
- पहिला टी-20 सामना – दि. 11 जानेवारी, मोहाली
- दुसरा टी-20 सामना – दि. 14 जानेवारी, इंदोर
- तिसरा टी-20 सामना – दि. 17 जानेवारी, बेंगळूर.









