वृत्तसंस्था/ अहमदाबाद
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा थोडासा विचारात गुरफटलेला वाटत असून त्याने आता विश्रांती घ्यायला हवी, असे मत माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केली आहे. मुंबई इंडियन्सला गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात 55 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यात पुन्हा एकदा रोहित दबावाखाली चांगली कामगिरी करू शकला नाही. विश्व कसोटी स्पर्धेची अंतिम लढत जवळ आलेली असल्याने रोहित आपला फॉर्म परत मिळविण्यास उत्सुक असेल आणि थोडी विश्रांती घेणे हा त्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे, असे गावसकर यांनी म्हटले आहे.
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीच्या क्रमात काही बदल पाहायला मला आवडेल. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी असेही म्हणेन की, रोहितने काही काळ विश्रांती घ्यावी आणि जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे. शेवटच्या काही सामन्यांत तो पुनरागमन करू शकतो, परंतु सध्या तरी त्याऩे थोडी विश्रांती घेतली पाहिजे, असे ते स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले.
तो थोडासा वेगळ्या विचारात व्यग्र दिसत आहे. कदाचित या टप्प्यावर तो विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीबद्दल विचार करत असेल, मला माहीत नाही. पण मला वाटते की, या टप्प्यावर त्याला थोडा ब्रेक हवा आणि शेवटच्या तीन किंवा चार सामन्यांत तो पुनरागमन करू शकेल, ज्यामुळे त्याला जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत फॉर्मात येण्यास मदत होईल, असे गावसकरनी म्हटले आहे.
यंदाच्या आयपीएलमधील मोहिमेत मुंबई इंडियन्सने चार पराभवांची नोंद केल्यामुळे त्यांची सुऊवात धक्कादायक झाली आहे आणि शेवटच्या षटकांमधील त्यांची गोलंदाजी हे चिंतेचे प्रमुख कारण राहिलेले आहे. या टप्प्यावरून झेप घेऊन प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यांना ‘आयपीएल प्लेऑफ’साठी पात्र ठरण्याकरिता चमत्काराची गरज लागेल. मुंबई इंडियन्स सध्या ज्या स्थितीत आहे ते पाहता ते चौथ्या क्रमांकावर येऊ शकतात, परंतु त्यासाठी त्यांना फलंदाजी आणि गोलंदाजीत असाधारण प्रदर्शन घडवावे लागेल, याकडे गावसकर यांनी लक्ष वेधले. मुंबई इंडियन्स आपली पुढील लढत येत्या रविवारी वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध लढणार आहे.









