आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप : गिल पहिल्या तर विराट चौथ्या स्थानावर
वृत्तसंस्था/दुबई
वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेत फलंदाजीतील फ्लॉप शोमुळे पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझमची आयसीसी वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. याचा फायदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही सामना न खेळणाऱ्या भारतीय कर्णधार रोहित शर्माला झाला आहे. रोहित आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत कोणताही सामना न खेळता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय, ताज्या क्रमवारीत शुभमन गिल अव्वलस्थानी असून विराट कोहली चौथ्या, श्रेयस अय्यर आठव्या स्थानावर आहे.
रोहितची 756 गुणांची वाढ ही पाकिस्तानच्या बाबर आझमच्या घसरणीमुळे झाली आहे. बाबरच्या वेस्ट इंडिजमधील खराब कामगिरीनंतर 751 गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. गिलने अव्वल स्थान कायम राखले आहे. परंतु रोहितच्या गुणांच्या वाढीमुळे एकदिवसीय फलंदाजीतील वर्चस्वासाठी एक रोमांचक शर्यत सुरू झाली आहे. विशेषत: दोघेही ऑक्टोबरमध्ये भारताच्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मालिकेत खेळणार आहेत.
टॉप-10 मध्ये टीम इंडियाचे वर्चस्व
गिल आणि रोहितव्यतिरिक्त भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (736 गुण) चौथ्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यरचाही टॉप 10 मध्ये समावेश आहे. तो 704 च्या रेटिंगसह रँकिंगमध्ये आठव्या स्थानावर आहे. आयसीसीच्या टॉप 10 फलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारत हा एकमेव संघ आहे, ज्या संघाचे चार फलंदाज समाविष्ट आहेत. रोहित आणि कोहलीच्या भविष्याबद्दलच्या अटकळांच्या पार्श्वभूमीवर ही क्रमवारी वाढली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर ते दोघेही एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्त होऊ शकतात, असे वृत्त आहे. बीसीसीआयने निर्णय घेण्याची कोणतीही घाई फेटाळून लावली असून दोन्ही खेळाडूंनी यापूर्वीच सराव सुरू केला आहे. रोहितने मुंबईमध्ये अभिषेक नायर यांच्याशी संपर्क साधला आहे तर कोहली लंडनमध्ये इनडोअर नेटमध्ये सराव करत आहे.
गोलंदाजी क्रमवारीत कुलदीप दुसऱ्या स्थानी
आयसीसी वनडेतील गोलंदाजी क्रमवारीत टॉप-10 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर तर रवींद्र जडेजा 9 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी एका स्थानाचा फटका बसला आहे. शमी आता 14 व्या तर सिराज 15 व्या क्रमांकावर आहे. लंकेचा महेश थिक्षणा अव्वलस्थानी असून दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज तिसऱ्या स्थानावर आहे.
पुऊषांची एकदिवसीय फलंदाजी क्रमवारी
क्र. संघ खेळाडू गुण
1 भारत शुभमन गिल 784
2 भारत रोहित शर्मा 756
3 पाकिस्तान बाबर आझम 751
4 भारत विराट कोहली 736
5 न्यूझीलंड डॅरील मिचेल 720









