वृत्तसंस्था /राजकोट
विंडीज व अमेरिका येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच करणार असल्याचे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपविण्यात आले होते. गेल्या वर्षी झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये खेळणार नाहीत, अशी चर्चा सुरू झाली होती. येत्या जूनमध्ये टी-20 विश्वच् षक स्पर्धा होणार आहे. 2023 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम लढतीत भारत वर्ल्ड कप जिंकून शकला नाही, पण सलग दहा सामने जिंकून भारताने मने जिंकली होती. 2024 टी-20 विश्वचषकाची अंतिम लढत बार्बाडोस येथे होणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय तिरंगा निश्चित फडकवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खांदेरीमधील सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमचे नामकरण करण्यात आले, त्या कार्यक्रमास शहा उपस्थित होते. वरिष्ठ प्रशासक राहिलेले निरंजन शहा यांचे नाव स्टेडियमला देण्यात आले असून तेही यावेळी उपस्थित होते.









