वृत्तसंस्था /दुबई
आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय संघांचा कर्णधार रोहित शर्माने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचे मानांकन पाच अंकांनी वधारले आहे. यापूर्वी तो मानांकनात 11 व्या स्थानावर होता. सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कर्णधार शर्माने 131 धावा झोडपल्या आहेत तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध त्याने 43 चेंडूत 86 धावा झोडपल्या होत्या. आयसीसीच्या या ताज्या फलंदाजांच्या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि फलंदाज डि कॉकने तिसरे स्थान पटकावले आहे. डि कॉकने लंका विरुद्ध शानदार शतक (100) तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने या स्पर्धेतील दुसरे शतक (109) झळकविले आहे. दक्षिण आफ्रिकेचा व्हॅन डेर ड्युसेन चौथ्या स्थानावर आहे. अफगाणचा गुरुबाज 18 व्या तर नेदरलँडस्चा कर्णधार एडवर्डस् 27 व्या स्थानावर आहे. या मानांकन यादीत पाकचा कर्णधार बाबर आझम 836 मानांकन गुणांसह पहिल्या तर गिल दुसऱ्या स्थानावर आहे. वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत न्यूझीलंडचा बोल्ट पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा हॅझलवूड दुसऱ्या, अफगाणचा रशिदखान चौथ्या, दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज पाचव्या स्थानावर आहे. बुमराह सातव्या स्थानावर आहे. वनडे अष्टपैलूंच्या मानांकन यादीत बांगलादेशचा शकीब अल हसन पहिल्या स्थानावर आहे.









