काँग्रेस प्रवक्तीच्या टोमण्यांमुळे वाद, पक्षाने हात झटकले, भाजपने चांगलेच खडसावले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा क्रिकेट कप्तान रोहित शर्मा हा जाड्या असून कप्तान म्हणूनही त्याची कामगिरी अतिसामान्य आहे, अशी टोमणेबाजी काँग्रेसची प्रवक्ती शमा मोहम्मद हिने केली आहे. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात आणि राजकारणात मोठेच वादंग माजले आहे. भारतीय जनता पक्षाने मोहम्मद हिला या टिप्पणीनंतर चांगलेच खडसावले आहे. काँग्रेस पक्षानेही आपले हात झटकले आहेत. सोशल मिडियावर शमा मोहम्मद हिच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. त्यामुळे अखेर तिला आपली ही टिप्पणी सोशल मिडियावरुन मागे घ्यावी लागली आहे. पण वाद थांबलेला नाही.
क्रिडापटूने शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजे. पण भारताचा क्रिकेट कप्तान रोहित शर्मा जाड्या आहे. कप्तान म्हणून तो प्रभावहीन आहे. तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात निष्प्रभ कप्तान आहे. अशी टिप्पणी मोहम्मद हिने रविवारच्या भारत आणि न्यूझीलंड सामन्यानंतर ‘एक्स’ वर प्रसारित केली. या सामन्यात रोहित शर्माने भारतासाठी 17 चेंडूंमध्ये 15 धावा काढल्या. भारताने हा सामना 44 धावांनी जिंकला. आता चँपियन्स करंडक स्पर्धेत भारताने आपल्या गटात प्रथम स्थानासह 6 गुण प्राप्त केले असून उपांत्य श्रेणीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना दुसऱ्या गटातून द्वितीय स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
भारतीय जनता पक्षाचा घणाघात
शमा मोहम्मद हिची ही टिप्पणी संकुचित आणि कुत्सित मनोवृत्तीचे उदाहरण आहे. काँग्रेसचे कप्तान राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा 90 निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. तरीही राहुल गांधी काँग्रेससाठी सर्वोत्तम कप्तान आहेत. पण भारताला अनेक मालिकांमध्ये, अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून देणारा आणि आयसीसी 20-20 चषक स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळवून देणारा कप्तान रोहित शर्मा हा मात्र प्रभावहीन कप्तान आहे, अशी खोचक आणि बोचरी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहझाद पूनावाला यांनी सोशल मिडियात केली आहे.
आता क्रिकेट लक्ष्य
काँग्रेसने आतापर्यंत भारताला विरोध केला. भारताच्या सेनादलांना विरोध केला. भारतीय राज्यव्यवस्थेच्या विरोधात काँग्रेस आहे, असे प्रतिपादन काँग्रेस सातत्याने करीत असते. भारताच्या प्रत्येक संस्थेचा पाणउतारा या पक्षाने केला. आता या पक्षाने भारतीय क्रीडा क्षेत्राला लक्ष्य केलेले दिसून येते. अपयशाने सैरभैर झालेली काँग्रेस आता क्रिकेटवर अकलेचे तारे तोडत आहे, अशा अर्थाची विधाने पूनावाला यांनी केली असून सर्वसामान्य नागरिकांनीही मोहम्मद हिचा समाचार घेतला आहे.
नफरत की भजन
काँग्रेस देशात प्यार की दुकान खोलण्याची भाषा करते. तथापि, या पक्षाची कृती आणि वाणी मात्र, ‘नफरत की भजन’ अशी आहे, अशीही टिप्पणी शहजाद पूनावाला यांनी केली असून शमा मोहम्मद हिच्या विधानाचे संतप्त पडसाद आता विविध क्षेत्रांमध्ये उमटू लागले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्तीने ही गंभीर चूक केली आहे, असे मत देशातील विविध मान्यवरांनी व्यक्त केले असून या मान्यवरांमध्ये बहुतेक सर्व राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे.
राजदीप सरदेसाईची टीका
क्रिकेटपटूचा प्रभाव त्याच्या वजनाच्या किलोंवर नव्हे, तर त्याच्या धावांच्या संख्येवर ठरत असतो. रोहित शर्मा एक उत्कृष्ट कप्तान आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने अनेक सामने आणि करंडक जिंकले आहेत. त्याच्यावर अशा प्रकारची टिप्पणी करणे योग्य नाही. शमा मोहम्मद हिला अशी टीका सुचली तरी कोठून, असा टोला पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सोमवारी लगावला आहे.
बीसीसीआयचा प्रतिवार
काँग्रेस प्रवक्ती शमा मोहम्मद हिची टीका अयोग्य आणि वस्तुस्थितीला सोडून आहे, असा प्रतिवार भारतीय क्रीकेट नियामक मंडळाने केला आहे. भारताचा क्रीकेट संघ सध्या चँपियन्स करंडक स्पर्धेत खेळत आहे. अशा स्थितीत काँग्रेस प्रवक्तीने केलेली टिप्पणी भारतीय संघाला हतोत्साहित करु शकते. त्यामुळे अशा प्रकारची भाषा करणे हे दुर्दैवी आणि असमर्थनीय आहे, अशा शब्दांमध्ये भारतीय क्रीव्रे नियमाक मंडळाचे सचिव देवाजीत सायकिया तिचा समाचार घेतला आहे.
देशभर संतापाची लाट
ड काँग्रेस प्रवक्ती शमा मोहम्मदच्या टिप्पणीमुळे देशभर संतापाची भावना
ड अनेक क्षेत्रांमधील नामवंतांकडून तिच्या टिप्पणीचा कठोर शब्दांत निषेध
ड लोकक्षोभामुळे अखेर प्रवक्तीकडून तिची पोस्ट करण्यात आली डीलीट









