वृत्तसंस्था/ दुबई
‘आयसीसी’ने वर्षाचा एकदिवसीय संघ निवडलेला असून रोहित शर्माला या ‘आयसीसी ओडीआय टीम ऑफ दि इयर’च्या कर्णधारपदाचा मान देण्यात आला आहे. त्यामध्ये स्टार फलंदाज विराट कोहली तसेच मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांच्या जोडीसह इतर पाच भारतीयांचा समावेश आहे.
आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, या संघात मुख्यत: विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारत (उपविजेता) आणि ऑस्ट्रेलिया (विजेता) या संघांतील खेळाडू आहे. याशिवाय उपांत्य फेरीत पोहोचलेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंचाही त्यात समावेश आहे.
फलंदाजांच्या वरच्या फळीत रोहित आणि शुभमन गिल या सलामीवीरांचा समावेश आहे. भारतीय कर्णधाराने गेल्या वर्षी 52 च्या सरासरीने 1,255 धावा जमविल्या, तर गिलने किवीजविऊद्ध शानदार 208 धावा केल्या आणि तो एकदिवसीय सामन्यांत त्या वर्षात सर्वाधिक धावा करणारा (1,584) खेळाडू देखील ठरला.
तिसऱ्या क्रमांकावर ट्रॅव्हिस हेडची वर्णी लागलेली असून तो वर्षभर सातत्यपूर्ण राहिला आणि विश्व़चषकात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. यात अंतिम फेरीतील त्याच्या 137 धावांच्या खेळीचा समावेश होतो. मधल्या फळीत भारतीय दिग्गज कोहली, त्यानंतर डॅरिल मिशेल, हेन्रिक क्लासेन आणि मार्को जॅनसेन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कोहली हा गेल्या वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये धावा जमविण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर (1,337 धावा) राहिलेला असून वर्षभरात त्याने सहा शतके झळकावली. त्याने विश्वचषकात स्पर्धावीर पुरस्कार जिंकण्याबरोबरच सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकांचा विक्रम मागे टाकला.
दुसरीकडे मिशेलने 52.34 च्या सरासरीने आणि 100.24 च्या स्ट्राईक रेटने पाच शतकांसह 1204 धावा जमवल्या. क्लासेननेही संपूर्ण वर्षभर फलंदाजीत वर्चस्व गाजवले. सेंच्युरियनमध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्धचा सामना जिंकून देणारी 174 धावांची खेळी हे त्याच्या कामगिरीचे मुख्य वैशिष्ट्या राहिले. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियन अॅडम झॅम्पासह मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या भारतीय त्रिकुटाचा समावेश करण्यात आलेला आहे. झॅम्पाने संपूर्ण वर्षभरात 26.31 च्या सरासरीने 38 बळी घेतले आणि सलग तीन विश्वचषक सामन्यांमध्ये चार बळी टिपले. तसेच विश्वचषक स्पर्धेत तो सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला.
सिराजने वर्षभरात 44 बळी घेतले. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेविऊद्ध त्याने 21 धावांत 6 बळी घेऊन कमाल केली. तर कुलदीपने गेल्या वर्षी 49 एकदिवसीय बळी घेतले. त्यात आशिया चषकाच्या सुपर-फोर टप्प्यात पाकिस्तानविऊद्ध 25 धावांत घेतलेल्या 5 बळींचा समावेश आहे. शमी तर संपूर्ण वर्षभर वर्चस्व गाजवत राहिला आणि त्याने चार वेळा 5 बळी घेतले. मुंबईतील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविऊद्ध 57 धावा देऊन त्याने घेतलेले 7 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. दरम्यान, आयसीसीच्या वर्षातील महिला संघात मात्र एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही.









