आयसीसी कसोटी क्रमवारी : यशस्वी जैस्वाल 63 व्या स्थानी, विराट, सिराजलाही फायदा
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ताज्या कसोटी क्रमवारीतही फलंदाजांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. मागच्या आठवड्यात त्याने सर्वोत्तम 10 फलंदाजांमध्ये स्थान पटकावले होते. त्याव्यतिरिक्त भारताच्या विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांनाही कसोटी क्रमवारीत लाभ मिळाला आहे. तसेच पदार्पणात शानदार खेळी साकारणाऱ्या यशस्वी जैस्वाललाही 11 स्थानाचा फायदा झाला आहे.

रोहित शर्माने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात 80 आणि 67 धावांची खेळी केली. याच प्रदर्शनाचा फायदा ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधाराला झाल्याचे दिसते. तसेच दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीने महत्वपूर्ण शतकी खेळी केली होती. विराटला या खेळीच्या जोरावर 22 गुण मिळवले. सध्या त्याच्याकडे 733 गुण असून तो 14 व्या क्रमांकावर कायम आहे. तसेच भारताचा रिषभ पंत 12 व्या तर चेतेश्वर पुजारा 31 व्या स्थानी, जडेजा 37 व्या, श्रेयस अय्यर 40 व्या तर अजिंक्य रहाणे 41 व्या स्थानावर आहेत.
न्यूझीलंडचा केन विल्यम्सन अव्वलस्थानी कायम
याशिवाय, फलंदाजांच्या यादीत केन विलियम्सन (883 गुण) पहिल्या क्रमांकावर कायम असून ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन 869 गुणासह दुसऱ्या, इंग्लंडचा जो रुट 852 गुणासह तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत. चौथ्या क्रमांकावर ट्रेविस हेड आहे, ज्याच्याकडे 847 गुण आहेत. पाचव्या क्रमाकावर 835 गुणांसह पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 833 गुणासह सहाव्या, न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल 792 गुणासह सातव्या, उस्मान ख्वाजा 788 गुणासह आठव्या, लंकेचा दिमुथ करुणारत्ने 759 गुणासह नवव्या स्थानावर आहे.
गोलंदाजीत भारताचा अश्विन पहिल्या स्थानी कायम
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कसोटी गोलंदाजीमध्ये मोठी झेप घेतली आहे. सहा स्थानांच्या फायद्यासह सिराज 33 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्याकडे 560 गुण असून ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग आहे. सिराजने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एका डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय दिग्गज रविचंद्रन अश्विन गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अश्विनकडे 879 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा रबाडा 825 गुणासह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 802 गुणासह तिसऱ्या स्थानी आहे. याशिवाय, टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू जडेजाला एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता सहाव्या स्थानी आला आहे तर जसप्रीत बुमराह 11 व्या स्थानावर आहे.









