शनिवारी, रविवारी रोड शो, सभांचे आयोजन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना मतदारांकडून भरघोस प्रतिसाद दिला जात आहे. आता या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार बेळगावमध्ये येणार आहेत. 29 व 30 एप्रिल रोजी बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण व खानापूर मतदारसंघात त्यांच्या सभा होणार असून यावेळी ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.
काहि महिन्यांपूर्वी त्यांनी बेळगावला धावती भेट देऊन आपण लवकरच पुन्हा बेळगावला येऊ, असे आÍवासन दिले होते. म. ए. समितीचे उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी ते सर्व मतदारसंघात जाऊन प्रचासभा घेणार आहेत.
मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन प्रचारासाठी नेतेमंडळी पाठवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार रोहित पवार यांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. 29 रोजी बेळगाव उत्तर मतदारसंघात सायंकाळी 7 वाजता पदयात्रा, त्यानंतर सभा होणार आहे. 30 रोजी सकाळी 8 वाजता ग्रामीण मतदारसंघात रोड शो, 10 वाजता कोपरा सभा घेतली जाणार आहे. दुपारी 12 वाजता खानापूर मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटी व कोपरा सभा होणार आहे. सायंकाळी 5 वाजता बेळगाव दक्षिण मतदारसंघात रोड शो व त्यानंतर सभा घेतली जाणार आहे.








