अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. केतकीला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने तिला 18 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. केतकीच्या या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी तिचे समर्थन केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्य़ान आमदार रोहित पवार यांनी सदाभाऊंवर टीका केली आहे. भाजपाचे बडे नेते गप्प राहून छोटे नेते पुढे येतात अशी टीका त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी केतकी चितळेच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. सदाभाऊंवर निशाणा साधताना ते म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी केतकीला समर्थन देण योग्य नाही. भाजपाचे मोठे नेते गप्प राहून छोटे नेते पुढे येतात. भाजपच्या नेत्यांना सुबुद्धी मिळावी अशी भाजपावरही टीका त्यांनी यावेळी केली आहे.
काय म्हणाले सदाभाऊ
केतकी चितळे ही कणखर आहे. कारण कोर्टात कुठलाही वकील न देता तीने एकटीनं आपली बाजू मांडली. त्यामुळं तिला कोणाच्या समर्थनाची गरज नाही. केतकीच्या पोस्टवर तुमच्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या होत्या, हे धंदे आता बंद करा. सरकार पुरस्कृत दहशतवाद तुम्ही राज्यात वाढवत आहात का? तुमच्या पोलिसांवर तुमचा विश्वास नाहीये का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावरून सोलापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यानंतर सदाभाऊंनी मी केतकीच्या पोस्टचं समर्थन केलेलं नाही. तर न्यायालयात खंबीरपणे उभी राहिली याचं कौतुक केलं आहे असा खुलासा केला आहे.