आर. एम. चौगुले यांची प्रचारफेरी
वार्ताहर /किणये
बेळगाव ग्रामीणचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्राचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांचे चिरंजीव रोहित आर. पाटील यांची बेळगुंदी येथे सोमवार दि. 1 रोजी रात्री 8 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. यामुळे सीमाबांधवांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आर. एम. चौगुले यांना ग्रामीण मतदार क्षेत्रातून पाठिंबा वाढत आहे. विविध गावांमध्ये त्यांच्या रोज काढण्यात येणाऱ्या प्रचारफेरीला समिती कार्यकर्त्यांचा व समर्थकांचा प्रतिसाद वाढतो आहे. अनेक गावांमध्ये महिला स्वयंस्फूर्तीने प्रचारफेरीत सहभागी होऊ लागल्या आहेत. ग्रामीणमध्ये म. ए. समितीचा भगवा फडकविण्याचा निर्धार समिती कार्यकर्त्यांनी केला आहे. रविवारी महाराष्ट्राचे युवा आमदार रोहित पवार यांच्या बेळवट्टी व उचगाव येथे कोपरा सभा झाल्या. त्यांनी सीमाबांधवांना मार्गदर्शन केल्यामुळे समितीमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे. यात अधिक भर पडणार आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील सेमवारी बेळगुंदी येथे सीमाबांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. आर. आर. पाटील यांचे नेहमीच सीमाप्रश्नासाठी मोठे योगदान लाभले आहे. आबांचे नुसते नाव जरी ऐकले तरी सीमाबांधवांमध्ये एक वेगळ्या प्रकाराचा जोश निर्माण होतो. त्यांचे चिरंजीव रोहित आर. पाटील यांची बेळगुंदीत सभा होणार असल्यामुळे ग्रामीणमध्ये आर. एम. चौगुले यांचा जोरदार प्रचार होणार आहे. सोमवार दि. 1 रोजी सकाळी 7 वाजता आर. एम. चौगुले यांची कोंडसकोप्प, खमकारहट्टी, कोळीकोप्प येथे प्रचारफेरी काढण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता बोकनूरमध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर बेळगुंदी गावात पदयात्रा होऊन रात्री 8 वाजता रोहित पाटील यांची सभा होणार आहे. आर. एम. चौगुले यांच्या सदाशिवनगर येथील प्रचार कार्यालयात सोमवार दि. 1 रोजी दुपारी 12 वाजता निवड कमिटीच्या सदस्यांची व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये निवड कमिटीच्या सदस्यांनी आपल्या गावातील बुथ कमिटी सदस्यांची नावे द्यायची आहेत. निवडणूक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.









