शेवटच्या क्रमांकावर समाधान : लखनौचा 18 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ मुंबई
रोहित शर्मा आणि नमन धीर यांच्या अर्धशतकानंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. लखनौने दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 196 धावांपर्यंत पोहचला. लखनौने मुंबईवर 18 धावांनी विजय मिळवत शेवट गोड केला पण मुंबईचा शेवट खराब झाला. साखळी फेरीतील अखेरचा सामनाही त्यांना गमावावा लागला. मुंबईला 14 सामन्यात फक्त 4 विजय मिळवता आले. गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाला दहाव्या क्रमांकावर आहे. विजयानंतरही लखनौला प्ले ऑफपर्यंत पोहोचता आले नाही. 29 चेंडूत 75 धावांची खेळी साकारणाऱ्या लखनौच्या निकोल्स पूरनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

लखनौने विजयासाठी दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात शानदार झाली. रोहित शर्मा आणि डेवॉल्ड ब्रेविस यांनी 88 धावांची भागिदारी केली. ब्रेविस 23 धावा काढून बाद झाला. नवीन उल हकने ब्रेविसला तंबूत धाडत लखनौला पहिले यश मिळवून दिले. यानंतर मुंबईचा डाव ढासळला. दुस्रया बाजूला विकेट पडत गेल्या. अनुभवी सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आले नाही. कृणाल पंड्याने त्याला बाद केले. दुसरीकडे, रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. रोहितने 38 चेंडूमध्ये तीन षटकार आणि दहा चौकारांच्या मदतीने 68 धावा चोपल्या. रवि बिश्नोईने रोहित शर्माला बाद करत लखनौला मोठे यश मिळवून दिले.
कर्णधार हार्दिक मोक्याच्या क्षणी स्वस्तात तंबूत परतला. नेहाल वढेराला मोठी खेळी करता आली नाही. इशान किशन आणि नमन धीर यांनी अखेरच्या काही षटकात फटकेबाजी केली पण त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. इशान किशनने 14 धावा केल्या तर नमन धीरने 28 चेंडूत नाबाद 62 धावांचे योगदान दिले. मुंबईला 20 षटकांत 6 बाद 196 धावापर्यंतच मजल मारता आली. लखनौकडून रवि बिश्नोई व नवीन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. प्रारंभी, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरच्या सामन्यात मुंबईने जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आणि टीम डेविड यांना आराम दिला. अर्जुन तेंडुलकर आणि डेवाल्ड ब्रेविस यांना संधी देण्यात आली. वानखेडेच्या मैदानावर मुंबईकडून शानदार सुरुवात करण्यात आली. नुवान तुषाराने पहिल्याच षटकात देवदत्त पडीक्कलला तंबूत धाडले. यानंतर केएल राहुल आणि मार्कस स्टोनिस यांनी लखनौच्या डावाला आकार दिला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. पियुष चावलाने ही जोडी फोडत मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. स्टोनिस 28 धावा काढून माघारी परतला. दीपक हुडाही फार काळ मैदानावर टिकला नाही. 11 धावांवर चावलानेच त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी लखनौची 3 बाद 69 अशी स्थिती होती.
पूरनचे तुफानी अर्धशतक, 29 चेंडूत 75 धावा
यावेळी निकोलस पूरन आणि केएल राहुल या दोघांमध्ये शतकी भागिदारी झाली. केएल राहुल यानं संयमी फलंदाजी केली, तर दुसऱ्या बाजूला पूरनने वादळी फलंदाजी केली. पूरनने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करताना 29 चेंडूत 75 धावांचा पाऊस पाडला. आपल्या वादळी खेळीमध्ये त्याने आठ षटकार आणि पाच चौकार ठोकले. आक्रमक खेळणाऱ्या पूरनला नुवान तुषाराने बाद केले. पूरन बाद झाल्यानंतर पाठोपाठ अर्शद खानही बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. पुढील षटकात केएल राहुलला चावलाने बाद केले. राहुलने 41 चेंडूमध्ये 55 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. लागोपाठ तीन गडी बाद झाल्याने लखनौची 4 बाद 178 धावसंख्येवरुन 6 बाद 178 अशी स्थिती झाली होती. यावेळी आयुष बडोनी आणि कृणाल पांड्या यांनी अखेरच्या दोन षटकांमध्ये फटकेबाजी केली. बडोनीने 10 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या तर पंड्याने नाबाद 12 धावांची खेळी केली. यामुळे लखनौने 20 षटकांत 6 बाद 214 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईकडून पियुष चावला व नुवान तुषारा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 6 बाद 214 (केएल राहुल 41 चेंडूत 55, मार्क स्टोनिस 28, दीपक हुडा 11, निकोल्स पूरन 29 चेंडूत 5 चौकार व 8 षटकारासह 75, आयुष बडोनी नाबाद 22, कृणाल पंड्या नाबाद 22, नुवान तुषारा व पियुष चावला प्रत्येकी तीन बळी).
मुंबई इंडियन्स 20 षटकांत 6 बाद 196 (रोहित शर्मा 38 चेंडूत 68, ब्रेविस 23, सुर्यकुमार यादव 0, इशान किशन 14, हार्दिक पंड्या 16, वढेरा 1, नमन धीर 28 चेंडूत नाबाद 62, शेफर्ड नाबाद 1, नवीन उल हक व रवी बिश्नोई प्रत्येकी दोन बळी).









