वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंग्लंडमधील आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा हाच भारताचा कर्णधार म्हणून कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय कर्णधाराच्या नेतृत्वाखाली अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने शानदार विजय मिळविलेला आहे. त्या स्पर्धेच्या दुबईतील अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केले. रोहितच्या नेतृत्वाने क्रिकेट मंडळाला प्रभावित केलेले असून कसोटीमध्ये संघाचे नेतृत्व त्याच्याकडे कायम ठेवण्याच्या दृष्टीने त्याने विश्वास जिंकला असल्याचे दिसून येत आहे.
रोहितकडील कर्णधारपदाच्या बाबतीत पाहायला मिळालेले हे वळण रंजक आहे. गेल्या काही महिन्यांतील कसोटी सामन्यांत भारताने घरच्या मैदानावर आणि परदेशातील मैदानांवर केलेल्या कामगिरीचा विचार करता भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला आणि ऑस्ट्रेलियात रोहितच्या नेतृत्वाखाली एकही सामना जिंकता आला नाही. असे असले, तरी रोहितचे डावपेच आखण्याच्या बाबतीत कौशल्य आणि नेतृत्वाचा अनुभव हे घटक त्याच्याकडील जबाबदारी कायम ठेवण्याचा बाबतीत महत्त्वाचे ठरले असल्याची माहिती मिळाली आहे.
भारताकडे वरच्या फळीतील अनेक कुशल फलंदाज असले, तरी रोहितसारखा धोरणात्मक कौशल्ये असलेला उत्तराधिकारी सध्या पदरी नाही, असे निवड समितीला वाटते. रोहितची दबाव हाताळण्याची, गोलंदाजांना प्रभावीपणे वापरण्याची आणि अचूक क्षेत्ररक्षण लावण्याची क्षमता यांनी निवड समितीचे मन जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे दिसून येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितने फिरकीपटूंना प्रभावीरीत्या बदलले आणि विरोधी फलंदाजांना नमते घेण्यास भाग पाडले. त्यानेही बीसीसीआयला प्रभावित केले आहे.
इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी संयम, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता व खेळाच्या गतीवर नियंत्रण कसे ठेवायचे याचे आकलन आवश्यक आहे. बीसीसीआयच्या मते, हे गुण रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नुकत्याच मिळविलेल्या यशामध्ये दाखवले आहेत. याशिवाय भारताकडे दर्जेदार फलंदाज असले, तरी सध्या कर्णधारपदासाठी सुयोग्य उमेदवारांची कमतरता आहे. शुभमन गिल आणि रिषभ पंत याच्यासारखे खेळाडू कसोटीत संघाचे नेतृत्व करण्यास तुलनेने अननुभवी आहेत. के. एल. राहुलच्या फलंदाजीच्या क्रमवारीत सतत झालेले बदल तसेच संघातील स्थानासाठी पंतसोबतची त्याची स्पर्धा यामुळे तोही शर्यतीत राहिलेला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, परंतु दुखापतींच्या सततच्या समस्यांमुळे बीसीसीआयने त्याचा विचार न करण्याचे ठरविलेले असू शकते.









