वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघांचा कर्णधार रोहित शर्मा यापुढे टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची शक्यता नाही आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याने त्याच्या भविष्याबद्दल चर्चा केली होती, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे. नोव्हेंबर, 2022 मध्ये भारत टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बाहेर पडल्यानंतर रोहित क्रिकेटच्या या सर्वांत लहान स्वरूपातील एकही सामना खेळलेला नाही. तेव्हापासून हार्दिक पंड्याने टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.
36 वर्षीय रोहित 148 टी-20 सामने खेळलेला असून चार शतकांसह सुमारे 140 च्या स्ट्राइक रेटने 3853 धावा केल्या आहेत. ‘ही नवीन घडामोड नाही. रोहित गेल्या एका वर्षात एकही टी-20 लढत खेळलेला नाही. कारण त्याचे लक्ष एकदिवसीय विश्वचषकावर होते. यासंदर्भात त्याने निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली होती. त्याने स्वत:हून टी-20 पासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा पूर्णपणे रोहितचा निर्णय होता,’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.
रोहितनंतर भारताकडे चार सलामीवीर असून शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांचा त्यात समावेश होतो. या सर्वांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून दाखविलेली आहे. पण जर ते आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत चांगली कामगिरी करू शकले नाहीत, तर निवड समिती किंवा बीसीसीआयचे अधिकारी रोहितला त्याच्या सध्याच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्यास सांगू शकतात. हे समजण्यासारखे आहे की, कारकिर्दीच्या या टप्प्यावर रोहित त्याच्यावरील भाराचे व्यवस्थापन करून उर्वरित कारकिर्दीत दुखापतीमुक्त राहण्याची इच्छा बाळगून असेल.









