प्रतिनिधी मिरज
Miraj Rohit Handifod Murder Case : शहरातील गणेश तलाव येथे खून करून तलावात टाकलेले तरुणाचे शीर व हात-पाय शनिवारी दुपारी शोधून काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने तलावात शोध कार्य राबवले. पांढऱ्या रंगाच्या दोन प्लास्टिक पोत्यांमधून सदरचे अवयव मिळाले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणातील आरोपी राजेंद्र यल्लाप्पा हंडीफोड याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कर्जबाजारी मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने रोहित राजेंद्र हांदिफोड या तरुणाचा खून केला. संशियत बाप राजेंद्र हंडिफोड याने मुलाच्या शरीराचे तुकडे केले होते. शीर आणि हातपाय तलावात फेकले होते. तसेच धड सुभाषनगर येथील प्लॉटवर ठेवण्यात आले होते. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सुभाषनगर येथून मयताचे धड ताब्यात घेतले होते.
उर्वरित अवयवांचा शोध घेण्यासाठी शनिवारी दिवसभर गणेश तलावात शोध कार्य राबविण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने हुक टाकून तलावाच्या पाण्यात शोध घेतला असता पांढऱ्या रंगाची दोन प्लास्टिक पोती मिळून आली. यामध्ये एका पोत्यात हात आणि पाय होते. तर दुसऱ्या पोत्यात शिर होते. पोलिसांनी सर्व अवयव ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयाकडे पाठवले आहेत.
मुलाच्या खून प्रकरणी अटकेत असलेला संशयित बाप राजेंद्र हंडीफोड याला न्यायालयासमोर उभे केला असता त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. अवयवांचे शोध कार्य सुरू असताना गणेश तलाव येथे बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.









