ब्रॉन्को, यो यो टेस्टमध्ये रोहितसह बुमराह, शुभमन, सिराज, जैस्वाल, शार्दुल पास
वृत्तसंस्था/ बेंगळूर
बीसीसीआयने टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी यो-यो टेस्टसोबतच ब्रॉन्को टेस्टही लागू केली आहे. 38 वर्षीय रोहित शर्माने ब्रॉन्को टेस्ट आणि यो-यो टेस्ट दोन्ही पास केल्या आहेत. बीसीसीआयच्या बेंगळूर येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आयोजित फिटनेस कॅम्पदरम्यान भारतीय वनडे कर्णधाराने या दोन्ही टेस्ट पास केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहितसह जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, यशस्वी जैस्वाल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनीही या दोन्ही टेस्ट उत्तीर्ण केल्या असून हे सर्व खेळाडू नवीन हंगामासाठी पूर्णपणे तयार आहेत. 38 वर्षीय रोहितच्या नेतृत्वात गतवर्षी भारतीय संघाने टी-20 जेतेपदावर नाव कोरले होते. यानंतर रोहितने टी 20 प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. वर्षभरानंतर रोहितने कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला. कसोटी आणि टी-
20 प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर वनडेवर फोकस करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. दरम्यान, स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर गेल्यामुळे रोहित ब्रॉन्को टेस्ट पार करू शकेल का याबाबत साशंकता होती. मात्र रोहितने आपल्या कामगिरीने एनसीए व्यवस्थापनाला प्रभावित केले. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या चाचणीत ब्रॉन्को टेस्टचा अडथळा रोहितने पार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हिटमॅनचा जलवा
रोहित फिटनेस टेस्टआधी काही दिवस आधी जेव्हा तो कुटुंबासह सुट्टीवरून परतला होता, तेव्हा तो थोडासा जाड व पोट वाढलेला दिसत होता. पण अवघ्या 20 दिवसांत रोहितने मेहनतीने वजन कमी केले. विशेष म्हणजे, रोहितही या टेस्टमध्ये सहभागी झाला आणि उत्तम गुणांसह ती उत्तीर्ण केला. यामुळे त्याच्या फिटनेसवर संशय घेणाऱ्यांचे तोंड बंद झाले.
शुभमनसह जैस्वाल, सिराज, सुंदरही पास, आता विराटवर फोकस
रोहित शर्मासह 30 व 31 रोजी झालेल्या या दोन्ही टेस्टमध्ये शुभमन गिल, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर या खेळाडूंनीही कोणतीही अडचण न येता सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ही चाचणी दिली. आताच्या प्रमाणित यो-यो चाचणीव्यतिरिक्त, या तंदुरुस्ती चाचणीदरम्यान हाडांची घनता तपासण्यासाठी ‘डीएक्सए स्कॅन‘ही सोपी पद्धतही वापरली गेली. या चाचण्यामध्ये हे सर्व खेळाडू पास झाले आहेत. आता, रोहित व शार्दुल वगळता इतर सर्व खेळाडू आशिया चषकासाठी दुबईला रवाना होतील. दुसरीकडे, दिग्गज खेळाडू विराट कोहली लंडनमध्ये असून तो लवकरच फिटनेस टेस्टसाठी बेंगळूरला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.









