वृत्तसंस्था/ मुंबई
शनिवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 13 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. पंजाबविरुद्ध त्याने 27 चेंडूत 44 धावांची खेळी साकारली. या खेळीदरम्यान तीन षटकार खेचताना रोहितने आयपीएलमध्ये 250 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये 250 षटकार ठोकणारा रोहित तिसरा तर पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने 141 डावांमध्ये सर्वाधिक 357 षटकार मारले आहेत. तर 251 षटकारासह एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या स्थानावर आहे. हे दोन्ही फलंदाज आता आयपीएल खेळत नाहीत, त्यामुळे रोहितला आयपीएलमध्ये सिक्सर किंग बनण्याची मोठी संधी आहे. दरम्यान, या यादीत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी चौथ्या तर आरसीबीचा स्टार फलंदाज पाचव्या स्थानावर, केरॉन पोलार्ड सहाव्या स्थानी आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
ख्रिस गेल – 357 षटकार
एबी डिव्हिलियर्स – 251
रोहित शर्मा – 250
एमएस धोनी – 235 विराट कोहली- 229









