वृत्तसंस्था/ मेलबर्न
मेलबर्नमध्ये जाळ्यात सराव करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या गुडघ्याला, तर आकाश दीपच्या हाताला दुखापत झाली आहे. पण ऑस्ट्रेलियाविऊद्ध 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी या वेगवान गोलंदाजाने आपली दुखापत चिंताजनक नसल्याचे स्पष्ट केले आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर सराव क्षेत्रात थ्रोडाऊनचा सामना करताना दोन्ही खेळाडूंना दुखापत झाली आणि ते काहीसे अस्वस्थ दिसले. यामुळे ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या चार दिवस आधी दौऱ्यावर असलेल्या संघाला दुहेरी दुखापतीची भीती भेडसावू लागली आहे. डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्यानंतरही रोहितने फलंदाजी सुरू ठेवली. परंतु नंतर त्याने फिजिओथेरपिस्टकडून उपचार घेतले. तो काही वेळ खुर्चीवर पाय ताणून बसल्याचे आणि त्याच्या गुडघ्यावर बर्फ ठेवण्यात आल्याचे दिसून आले. तसेच तो सावधपणे चालत जाताना दिसला. त्याच्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी हाताला दुखापत झालेल्या आकाशने दोन्ही दुखापती या जाळ्यात सराव करताना सर्वसाधारणपणे होणाऱ्या दुखापती असल्याचे सांगितले.
क्रिकेट खेळताना अशा सर्वसामान्य दुखापती होतातच. मला वाटते की, ही सरावासाठीची खेळपट्टी पांढऱ्या चेंडूसाठीची आहे. त्यामुळे चेंडू कधी कधी खाली राहतो. पण या दुखापती सामान्य असून त्या चिंताजनक नाहीत, असे आकाशने नंतर पत्रकार परिषदेत सांगितले.









