वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या टेनिस प्रकारात रोहन बोप्पण्णाचा साथिदार एन. श्रीराम बालाजी किंवा युकी भांब्री राहिल, अशी माहिती अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या प्रवक्त्याने दिली आहे. या स्पर्धेसाठी निवड समितीशी चर्चा करुनच रोहन आपला साथिदार निवडणार आहे.
44 वर्षीय रोहन बोप्पण्णा हा दुहेरीच्या मानांकनात चौथ्या स्थानावर असून त्याने जागतिक मानांकनातील आघाडीच्या पहिल्या 10 टेनिसपटूंमध्ये आपले स्थान राखले आहे. टेनिसच्या नियमानुसार रोहनला आपला साथिदार निवडण्याचा पूर्ण अधिकार असून लवकरच तो याबाबत निर्णय घेणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिसमध्ये पुरूष दुहेरीत एकूण 32 जोड्या असून प्रत्येक देशाला कमाल दोन जोड्या उतरविण्याची परवानगी आहे. पुढील आठवड्यात फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा सुरु होणार असून सदर स्पर्धा संपल्यानंतर 10 जून दरम्यान एटीपी आणि डब्ल्यूटीएवरील ताजी मानांकन यादी जाहीर केली जाईल. बोप्पण्णाने पुरूष दुहेरीच्या प्रकारात श्रीराम बालाजी आणि युकी भांब्री यांच्या नावांची शिफारस राष्ट्रीय फेडरेशनकडे केली आहे. 27 जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भारताचा नवोदित टेनिसपटू सुमित नागलला फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत चांगली कामगिरी करुन आपले वैयक्तिक मानांकन सुधारण्याची संधी आहे. सध्या एटीपीच्या मानांकनात सुमीत नागल 94 व्या स्थानावर आहे.









