क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा येथे रोहन डिफेंडर स्पोर्ट्स क्लब आयोजित रोहन कुपेकर स्मृती चषक सेवन ए साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्वस्तिक एफसी संघाने आय ट्रव्हल संघाचा 1-0 असा निसटता पराभव करून रोहन कुपेकर चषक पटकाविला. शादाबला उत्कृष्ट खेळाडू तर युसूफला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले.
हिंडलगा येथील लक्ष्मी मंदिर शेजारच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात आय ट्रव्हल संघाने नील इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात शादाब याने 3 गोलसह हॅट्ट्रीक नोंदवली तर नील बॉईजतर्फे मंथनने गोल केला. दुसऱया उपांत्य सामन्यात स्वस्तिक एफसीने बबलू स्लॅमजर संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात जॅक्सनने एकमेव गोल केला.
अंतिम सामना प्रमुख पाहुणे आर. एम. चौगुले, सागर मन्नोळकर, चंद्रकांत कडोलकर, दयानंद भोगन, संतोष गुबची आदी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख करून देवून करण्यात आली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना यश आले नाही. दुसऱया सत्रात 36 व्या मिनिटाला सुशांक पेडणेकरने एकमेव गोल नोंदवत स्वस्तिकला मिळवून दिला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्वस्तिक एफसीला 31 हजार रूपये, आकर्षक चषक तर उपविजेत्या आय ट्रव्हल संघाला 21 हजार, चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू शादाब आय ट्रव्हल्स, उत्कृस्ट डिफेंडर संतोष जाधव स्वस्तिक, उत्कृष्ट गोलरक्षक युसूफ, उत्कृष्ट संघ रिव्हेंजर एफसी खानापूर यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी कैलास पाटील कोल्हापूर यांनी पंचाची भू†िमक बजावली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोहन डिफेंडरच्या पदाधिकाऱयांनी परिश्रम घेतले.









