बीसीसीआयच्या यादीत नावाला मंजुरी; घेतलेल्या ठरावाचा ई-मेल निर्धारित वेळेच्या आधीच पाठविला बीसीसीआयला
क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) स्थान मिळविणे हे प्रत्येक क्रिकेट संघटनेचे एक स्वप्न असते आणि तसे जीसीएचे होते आणि आहे. माझे बीसीसीआयतील स्थान हे समस्त गोवेकरांचा आणि गोव्याच्या क्रिकेटचा गौरव आहे. मात्र काहींनी यात विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी क्रिकेट जिंकली, असे बीसीसीआयचे संयुक्त सचिव आणि ‘परिवर्तन’ पॅनेलचे प्रमुख रोहन गावस देसाई म्हणाले.
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या समवेत अध्यक्षपदाचे उमेदवार महेश कांदोळकर, माजी सभापती राजेश पाटणेकर, दया पागी, रुपेश नाईक, मेघनाथ शिरोडकर व सुशांत नाईक उपस्थित होते. बीसीसीआयच्या 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत गोवा क्रिकेट संघटनेला मतदार म्हणून प्रतिनिधीत्व मिळणार का नाही, यावर सर्वांचे लक्ष राहून गेले होते.
बीसीसीआयच्या यादीत रोहन गावस देसाईंचे नाव
मात्र काल सायंकाळी बीसीसीआयने मतदार यादी जाहीर केली आणि यात विद्यमान संयुक्त सचिव रोहन गावस देसाई यांचे नाव अकराव्या स्थानावर झळकले. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्यात, शुक्रवारी जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक झाली होती, तेव्हा पाच सदस्यांनी रोहन गावस देसाई हे गोवा क्रिकेट संघटनेचे बीसीसीआयच्या बैठकीत प्रतिनिधी म्हणून ठराव घेतला होता. या ठरावानंतर सचिव शांबा देसाई यांनी अध्यक्ष विपुल फडके यांचे नाव बैठकीसाठी सुचविले आणि प्रकरण गुंतागुंतीचे झाले. शुक्रवारी मुदतीच्या कालावधीत जीसीए आपल्या प्रतिनिधीचे नाव निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवू शकले नव्हते व तसा ई-मेलही बीसीसीआयला पाठविला. त्यानंतर जीसीएचे संयुक्त सचिव असलेले रुपेश नाईक यांनी आपल्या पदाचा उपयोग करत सायंकाळी 7.10 वाजता बीसीसीआयला रोहन गावस देसाई यांचे नाव सुचविणाऱ्या ठरावाची माहिती बीसीसीआयच्या निवडणूक अधिकाऱ्याला ई-मेलने पाठविली. रुपेश नाईकने पाठविलेल्या ठरावाची दखल घेत बीसीसीआयच्या निवडणूक अधिकाऱ्याने रोहन देसाईंच्या नावाला मंजुरी दिली आणि जीसीएच्या गुंतागुंतीला पूर्णविराम दिला.
माझी नव्हे तर गोवा आणि जीसीएची विकेट पडली असती
‘गोव्याच्या क्रिकेटचा हा अपमान आहे. आपल्याला बीसीसीआयमध्ये पद मिळू नये यासाठी विरोधकांनी केलेला खटाटोप अखेर फसला. आपण आपल्या जीसीए आणि बीसीसीआयच्या कारकिर्दीत नेहमीच गोव्याच्या क्रिकेटच्या उत्कर्षाला पाठिंबा दिला आहे. संधी मिळाली तर यापेक्षाही जास्त काम करण्याची आणि गोव्याच्या क्रिकेटला फायदा मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहिल, असे रोहन देसाई म्हणाले.
गोवा क्रिकेट संघटनेचा प्रतिनिधी बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी पोहचला नसता तर आपली नव्हे तर गोव्याची आणि प्रामुख्याने गोवा क्रिकेट संघटनेची विकेट पडली असती, असे रोहन गांवस देसाई म्हणाले. मी माझ्याकडून पूर्ण तयारी केली होती. प्रतिनिधी म्हणून अर्जसुद्धा भरला होता आणि केवळ न्यायालयाच्या निर्देशाचे पालन होणे गरजेचे होते. मात्र जीसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीष शिंदेने एका व्यक्तीच्या सांगण्यावरून ही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही.
सध्याच्या जीसीए समितीने माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी माझं नाव समोर केले नव्हते तर क्रिकेटच्या हितासाठी केले होते. मी सध्या बीसीसीआयचा संयुक्त सचिव असल्याने राज्यातील क्रिकेटच्या हितासाठी माझं नाव त्यांना योग्य वाटले म्हणून त्यांनी माझ नाव सुचवले, असे रोहन गावस देसाई म्हणाले. दर तीन वर्षांनी आम्हाला बीसीसीआयच्या निवडणुकीत सहभागी होण्याची संधी असते, पण वैयक्तिक स्वार्थामागे आम्ही ही संधी गमवली असती, असेही देसाई म्हणाले.
शेवटी सत्याचाच विजय
काही प्रमाणात त्रास होतो, मात्र शेवटी सत्याचाच विजय होतो, असे रोहन देसाई म्हणाले. आता विरोधक असलेल्यांसमवेत मी काही महिने अगोदर त्यांच्या समवेत होतो. आताच त्यांच्यात का बदल झाला, याच कोडं मला अजूनही समजत नाही. माझ्या पाच सदस्यांनी मला पाठिंबा दिल्यामुळे मला परत बीसीसीआयच्या बैठकीत जाण्याची संधी मिळाली, असे देसाई म्हणाले. रुपेश नाईक यांचे योगदान या मोहिमेत मोलाचे असल्याचे देसाई म्हणाले.
क्रिकेट मैदान वन-म्हावळींगेतच
‘माझे परिवर्तन पॅनेल हे सत्तेवर आलेच पाहिजे. आम्हाला 107 क्लबांपैकी 80 क्लबांचा पाठिंबा आहे असे मी म्हणत नाहीय, मात्र क्लबांना बदल हवाय. क्लब बोलून दाखवत नाहीत. बदल पाहायला मिळणार आहे, असे रोहन देसाई म्हणाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे आमच्या प्रामुख्याने रडारवर आहे. कोलवाळ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान होणार नाही. क्रिकेट मैदान केवळ वन-म्हावळींगेतच होणार असल्याचे सांगून यासाठी जीसीएने आपल्या खजिन्यातून 45 कोटी दिले आहेत. एवढी मोठी साधसामुग्रीची निर्मिती करायची असेल, तर सरकारचा पाठिंबा हा आवश्यक आहे, असे रोहन गावस देसाई म्हणाले.









